बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे काल विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार होणार आहेत. या पार्श्वभूमीवर बारामती शहरात शोककळा पसरली असून, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये अत्यंत दुःखाचे वातावरण आहे.
अंत्ययात्रेसाठी सजविण्यात आलेला रथ सज्ज झाला असून, त्यावर अजित पवार यांचा मोठा फोटो लावण्यात आला आहे. अंत्ययात्रेला बारामतीतील गदीमा चौकातून सुरुवात होणार असून, मुख्य चौकातून मार्गक्रमण करत ही यात्रा विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात पोहोचणार आहे. तेथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
सध्या काटेवाडी येथे अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. हजारो कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिक अंतिम दर्शनासाठी गर्दी करत आहेत. शोकाकुल वातावरणात अश्रूंनी त्यांना निरोप दिला जात असून, पवार कुटुंबीय कार्यकर्ते आणि उपस्थितांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन करत आहेत.
हेही वाचा: Ajit Pawar Death: 'दादांना ‘आय लव्ह यू’ बोललो होतो, आता… ' अजित पवारांसोबतचा 'तो' किस्सा सांगत कार्यकर्ता भावूक
बारामतीकरांचे अलोट प्रेम अजित दादांना लाभले असून, बारामतीत लाखोंच्या संख्येने नागरिक जमा झाले आहेत. अंत्ययात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज यावेळी उपस्थित राहणार आहेत.
पवार कुटुंबावर तसेच संपूर्ण राज्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून, अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
हेही वाचा: Ajit Pawar Death: 'दादांना ‘आय लव्ह यू’ बोललो होतो, आता… ' अजित पवारांसोबतचा 'तो' किस्सा सांगत कार्यकर्ता भावूक