Praful Patel On Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या धक्क्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार सावरत असतानाच, पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक हृदयद्रावक आठवण सांगितली. अपघाताच्या आदल्या रात्री, म्हणजेच 27 जानेवारी रोजी रात्री 8:00 ते 8:30 च्या सुमारास अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात फोनवर संवाद झाला होता. कामाचे बोलणे झाल्यानंतर शेवटी दादा म्हणाले होते, "प्रफुल्ल, आता आपली भेट होणार नाही, कारण मी 8 ते 10 दिवस बाहेर आहे." भेटीबाबतचे हे वाक्य आज अक्षरशः खरे ठरले असून, दादा कायमचेच सर्वांना सोडून गेले आहेत.
सुनयना आणि सुप्रिया सुळेंचा टाहो
अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार दिल्लीहून तातडीने बारामतीत दाखल झाले. बारामतीत पाऊल ठेवताच सुप्रिया सुळे यांना आपले अश्रू अनावर झाले. पवार कुटुंबाचे निकटवर्तीय विठ्ठलदादा मणियार समोर येताच सुप्रिया सुळे त्यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडल्या. "तुमचा एकदम लाडला गेला," असा उल्लेख करत त्यांनी फोडलेला टाहो उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. सुनेत्रा पवार यांची अवस्थाही अत्यंत बिकट असून, त्यांना सावरणे कठीण झाले आहे.
निलेश लंके आणि अमोल मिटकरींचा आक्रोश
अजित पवार यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत असताना राजकीय सहकाऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला. खासदार निलेश लंके आणि आमदार अमोल मिटकरी या दोघांनीही दादांच्या देहासमोर टाहो फोडला. "दादा लय हुशार माणूस, ते असे जाऊच शकत नाहीत," असे म्हणत निलेश लंके ढसाढसा रडले. अमोल मिटकरींचा आक्रोश पाहून तिथे उपस्थित असलेले अनेक कार्यकर्ते सुन्न झाले होते. ज्या नेत्याने नेहमी कार्यकर्त्यांना ताकद दिली, तोच नेता आज असा शांत झालेला पाहून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
कसा घडला दुर्दैवी अपघात?
प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या विमानाने बारामती विमानतळावर उतरण्यासाठी दोन वेळा प्रयत्न केला होता. मात्र, तिसऱ्या वेळी लँडिंग करताना विमानाचा भीषण अपघात झाला. धुक्यामुळे विजिबिलिटी कमी असल्याचे प्राथमिक कारण सांगितले जात आहे. सकाळी 8:10 ला मुंबईहून निघालेले हे विमान 8:50 च्या सुमारास कोसळले आणि त्यात दादांसह एकूण 6 जणांचा अंत झाला. ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळा दिवस म्हणून नोंदवली गेली आहे.