Ajit Pawar Plane Crash: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी तपास आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. सुरुवातीला हवामानातील बिघाड आणि कमी दृश्यमानता हे अपघाताचे कारण मानले जात असले, तरी आता तपास यंत्रणांचे लक्ष एका निर्णायक प्रश्नावर केंद्रित झाले आहे. विमान लँडिंगचा अंतिम निर्णय नेमका कुणी घेतला?
या अपघाताच्या चौकशीसाठी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) यांच्या संयुक्त पथकांकडून सखोल तपास सुरू आहे. विशेषतः विमानाने लँडिंगसाठी केलेल्या दुसऱ्या प्रयत्नावर तपासाचा भर वाढवण्यात आला आहे. पहिल्या प्रयत्नात वैमानिकाने परिस्थिती लक्षात घेऊन ‘गो-अराउंड’चा निर्णय घेतला होता. मात्र दुसऱ्या प्रयत्नात, प्रतिकूल परिस्थिती असूनही लँडिंग करण्याचा धोका का पत्करण्यात आला, याचा उलगडा तपासात महत्त्वाचा ठरणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, तपास यंत्रणा चार प्रमुख मुद्द्यांच्या आधारे घटनाक्रमाचा आढावा घेत आहेत. पहिला मुद्दा म्हणजे दृश्यमानता. अपघाताच्या वेळी बारामती विमानतळ परिसरात दाट धुके होते आणि दृश्यमानता मर्यादित होती. अशा स्थितीत लँडिंगचा निर्णय योग्य होता का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरा मुद्दा म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून वैमानिकाला स्पष्ट परवानगी देण्यात आली होती का, की संवाद प्रणालीत काही तांत्रिक अडथळे निर्माण झाले होते?
हेही वाचा: Baramati By Election: अजितदादांनंतर बारामतीचा वारसदार कोण? पोटनिवडणुकीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग; सुनेत्रा पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
तिसरा मुद्दा विमानाच्या तांत्रिक स्थितीशी संबंधित आहे. अप्रोच किंवा लँडिंगच्या क्षणी इंजिन किंवा नियंत्रण यंत्रणेत अचानक काही बिघाड झाला होता का, याची तपासणी केली जात आहे. चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दुसऱ्या प्रयत्नात विमानाचा लँडिंग अँगल चुकला का, आणि त्यामुळेच ते धावपट्टीऐवजी बाजूच्या भागात जाऊन कोसळले का, याचा शोध घेतला जात आहे.
या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ दिल्लीतील विशेष प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. त्यामधील कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधून मिळणारी माहिती तपासासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या डेटामुळे वैमानिक आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलमधील संवाद, तसेच विमानाच्या हालचालींचे अचूक चित्र समोर येणार आहे.
हेही वाचा: Rohit Pawar : "10-12 तारखेला विमान अपघाताबाबत मोठा गौप्यस्फोट करणार" रोहित पवारांचा खुलासा
दरम्यान, महाराष्ट्र CID ने देखील या प्रकरणाचा स्वतंत्र तपास सुरू केला आहे. या अनुषंगाने अजित पवारांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली आहे. दौऱ्याचे नियोजन, विमानाची निवड, तसेच प्रवासासंबंधी घेतलेले निर्णय याबाबत माहिती घेतली जात आहे.
अपघातामागील नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी हा तपास अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ब्लॅक बॉक्समधील माहिती आणि विविध तपास संस्थांचे निष्कर्ष समोर आल्यानंतरच या दुर्घटनेतील अंतिम सत्य स्पष्ट होणार आहे.