Rohit Pawar Tweet: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. ठिकठिकाणी कार्यकर्ते, नागरिक आणि समर्थकांनी श्रद्धांजलीपर बॅनर्स लावून आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्जत शहरात घडलेल्या एका प्रकारामुळे वाद निर्माण झाला असून, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
कर्जत शहरात नागरिकांनी दुःखी मनाने लावलेले अजित पवार यांच्या श्रद्धांजलीचे बॅनर्स नगरपंचायतीकडून हटवण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. हे बॅनर्स ज्या पद्धतीने काढण्यात आले, ती अत्यंत आक्षेपार्ह असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडत सरकारकडे थेट मागणी केली आहे. “कर्जत शहरात नागरिकांनी अत्यंत जड अंतःकरणाने लावलेले अजितदादांच्या श्रद्धांजलीचे फ्लेक्स नगरपंचायतीने अतिशय वाईट पद्धतीने हटवले. हा प्रकार संतापजनक असून अजितदादांचा अवमान करणारा आणि नागरिकांच्या भावनांचा अनादर करणारा आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
रोहित पवार यांनी केवळ बॅनर हटवण्याच्या प्रकारावरच नाही, तर सध्या सुरू असलेल्या राजकीय चर्चांवरही नाराजी व्यक्त केली. “अजितदादांच्या निधनानंतर काहीजण राजकीय चर्चा करताना दिसत आहेत. मात्र आज कोणत्याही राजकीय चर्चेपेक्षा त्यांच्या जाण्याचं दुःख कितीतरी मोठं आहे,” असं ते म्हणाले. अजित पवार आज हयात असते, तर अशा चर्चांना त्यांनीच थांबवलं असतं, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पवार कुटुंबातील सदस्य म्हणून बोलताना रोहित पवार यांनी सर्वांना संयम राखण्याचं आवाहन केलं आहे. “दादांच्या आत्म्याला क्लेश होईल, त्यांच्या विचारांना ठेच पोहोचेल आणि त्यांच्या स्पष्ट स्वभावाला न शोभणाऱ्या गोष्टी सध्या टाळाव्यात,” अशी विनंती त्यांनी केली. योग्य वेळ आल्यावर चर्चा करता येईल, मात्र आज तो काळ नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.