अकोला: राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, याची प्रचिती अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये आली आहे. अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत केलेल्या युतीची चर्चा ताजी असतानाच, भाजपने आता अकोट नगरपालिकेत चक्क 'एमआयएम' (MIM) सोबत घरोबा केला आहे. सत्तेच्या समीकरणासाठी एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे झेंडे आता एकाच खांद्यावर दिसणार असून, या विचित्र राजकीय 'कडबोळ्याने' संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. सत्तेसाठी विचारसरणीला तिलांजली दिल्याचा आरोप आता विरोधकांकडून होऊ लागला आहे.
'अकोट विकास मंच' : सर्वपक्षीय खिचडी!
अकोट नगरपालिकेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सत्तेचे गणित जुळवण्यासाठी भाजपने 'अकोट विकास मंचा'ची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे, या आघाडीत केवळ सत्ताधारी महायुतीतील एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीच नाही, तर चक्क उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि बच्चू कडू यांचा प्रहार पक्षही सामील झाला आहे. या अजब युतीची नोंद जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून, भाजप आमदार रवी ठाकूर यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
असे जुळले 35 जागांचे गणित
अकोट नगरपालिकेत एकूण 35 जागा आहेत, त्यापैकी दोन जागा रिक्त असून 33 जागांवर निवडणूक पार पडली. भाजपला सर्वाधिक 11 जागा मिळाल्या, पण बहुमतासाठी 18 चा आकडा गाठणे कठीण होते. अशा वेळी पाच जागा जिंकलेल्या एमआयएमने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला. याशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन, शिंदेंच्या शिवसेनेचा एक, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन आणि प्रहारचे तीन सदस्य मिळून या आघाडीचे संख्याबळ 26 वर पोहोचले आहे.
भाजपचा 'व्हिप' सर्वांना बंधनकारक
या आघाडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यात सामील झालेल्या सर्वच पक्षांना आता भारतीय जनता पक्षाच्या 'व्हिप'चे पालन करावे लागणार आहे. म्हणजेच, विचारसरणी पूर्णपणे वेगळी असूनही एमआयएम आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या सदस्यांना भाजपच्या आदेशानुसार मतदान करावे लागेल. 13 जानेवारी रोजी होणाऱ्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीत ही आघाडी आपली ताकद दाखवणार आहे. दरम्यान, काँग्रेसचे पाच आणि वंचित बहुजन आघाडीचे दोन सदस्य आता विरोधी पक्षात बसणार आहेत.
विरोधकांच्या टीकेला आयते कोलीत
"भाजप सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते," या विरोधकांच्या टीकेला अकोटच्या या प्रकारामुळे बळ मिळाले आहे. एका बाजूला देशपातळीवर एमआयएमवर टीका करणारे भाजप नेते, स्थानिक पातळीवर मात्र त्याच पक्षासोबत सत्तेची स्वप्ने पाहत आहेत. आता या अजब युतीचा गाडा भविष्यात कसा चालणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे डोळे लागले आहेत.