अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात घडलेल्या लैंगिक शोषण प्रकरणाने आधीच राज्यभर संताप निर्माण केला असताना, आता या प्रकरणाशी संबंधित एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मुख्य आरोपी अयान अहमद हा भररस्त्यात वाढदिवस साजरा करताना दिसत असून, त्याचवेळी काही पोलीस कर्मचारी त्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत. यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.समोर आलेल्या दृश्यांनुसार, आरोपीने रस्त्यावरच फटाके फोडत केक कापून वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमादरम्यान काही पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. त्यापैकी काही जण आरोपीला केक भरवत असल्याचे दिसत असल्याने हा प्रकार अधिकच वादग्रस्त ठरला आहे. एकीकडे गंभीर गुन्ह्याचे आरोप असताना, दुसरीकडे आरोपीसोबत असा वर्तन होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
परतवाडा प्रकरणात संबंधित आरोपीवर तरुणींना ब्लॅकमेल करून त्यांचे शोषण केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांकडून सुरुवातीला दुर्लक्ष झाल्याची टीकाही होत आहे. अशा पार्श्वभूमीवर आता समोर आलेला हा व्हिडिओ पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे करत आहे.या घटनेनंतर संबंधित पोलिसांवर कारवाई होणार का, याबाबत उत्सुकता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोपीविरुद्ध आधीच गंभीर गुन्हे दाखल असताना त्याला अशा प्रकारे वागणूक देणे योग्य आहे का, यावरही चर्चा रंगली आहे.या घटनेमुळे समाजात संतापाची लाट पसरली असून न्यायव्यवस्थेवर विश्वास टिकवण्यासाठी कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.