Wednesday, May 14, 2025 11:00:24 PM

पत्नीनेच रचला नवऱ्याला लुटण्याचा कट; पतीवर हल्ला करून 95 हजारांची लूट

अमरावतीत पत्नीनेच पतीला लुटण्यासाठी 1200 रुपयांची सुपारी देत कट रचला. दोघांनी मिळून पतीवर हल्ला केला व 95 हजार रुपये लुटले. पोलिस तपासात सत्य उघड.

पत्नीनेच रचला नवऱ्याला लुटण्याचा कट पतीवर हल्ला करून 95 हजारांची लूट

अमरावती: माणूस आपल्या जवळच्या व्यक्तींवर सर्वात जास्त विश्वास ठेवतो. पण कधी कधी तीच व्यक्ती जेव्हा फसवते ,मग ते आयुष्यभर लक्षात राहतं. असाच एक धक्कादायक प्रकार अमरावतीच्या खोलापुरी परिसरात उघडकीस आला आहे, जिथे पत्नीनेच आपल्या पतीला लुटण्यासाठी कट रचला आणि अवघ्या 1200 रुपयांची सुपारी देत त्याच्यावर हल्ला घडवून आणला.

ही घटना अमरावती शहरातील खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. येरला येथील रहिवासी व्यापारी अजय संजय राठी (वय 25) हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीवरून अकोली रेल्वे फाटकाच्या दिशेने जात होते. यावेळी अचानक तोंडाला कापड बांधून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले आणि हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात राठी गंभीर जखमी झाले, आणि त्यांच्या जवळील 95 हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आली.

या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिस आयुक्तालयाच्या स्पेशल स्कॉडने जबरदस्त शक्कल लावून संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, ही लूटपाट कोण्या परक्या व्यक्तींनी नव्हे, तर स्वतः राठी यांच्या पत्नीनेच कट रचून घडवून आणल्याचे धक्कादायक सत्य समोर आले.

हेही वाचा: एनआयएच्या अहवालात नेमकं काय? पहलगाम हल्ल्यामागचं पाकिस्तानचं कारस्थान उघड

राठी यांच्या पत्नीने आपल्या मावसभावाला केवळ 1200 रुपयांची सुपारी देऊन पतीला लुटायचे ठरवले. मावसभावाने  आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने हा संपूर्ण हल्ला आखला.

पोलिसांनी या प्रकरणात व्यापारी अजय राठी यांच्या पत्नी, तिचा मावसभाऊ आणि त्याचे दोन साथीदार अशा चौघांना अटक केली आहे. चौकशीत सर्वांनी आपला गुन्हा कबूल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

या घटनेने संपूर्ण अमरावतीत खळबळ उडाली असून, सामाजिक स्तरावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एकीकडे स्त्री-पुरुष समानतेच्या युगात महिलांची भूमिका समाजात बदलत असताना, अशा घटनांमुळे विश्वासाला तडे जातात. आपल्याच पत्नीने, तेही फक्त पैश्यांसाठी पतीवर हल्ला करून लूट घडवून आणल्याची बाब चिंताजनक आहे.

पोलिसांकडून या प्रकरणातील इतर बाबींचा तपास सुरू असून, आरोपींना लवकरच न्यायालयात हजर केले जाणार आहे. हा प्रकार इतरांसाठी एक धडा ठरेल आणि अशा कटकारस्थानांना आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.


सम्बन्धित सामग्री