फलटण: आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अशातच, काही वेळापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी थेट माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना लक्ष्य केले. 'कांगावा करू नका, हा घ्या पुरावा', अशा शब्दांत दानवेंनी निंबाळकरांना आव्हान दिले आहे.
दानवेंनी रविवारी सकाळी एक्सवर एक लांबलचक पोस्ट लिहीली, ज्यामध्ये निंबाळकरांना या अत्याचार प्रकरणाशी जोडणारे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.
1 - उच्च रक्तदाबामुळे आरोपी मल्हारी अशोक चन्नेला (वय: 42) एका मृत महिला डॉक्टरने टूडी इको टेस्टसाठी रेफर केले होते. हा रेफरल दिल्यानंतर, दोन पीए महिला डॉक्टरकडे आले आणि म्हणाले की, 'खासदार साहेबांशी बोला'. आत्महत्या करणाऱ्या महिला डॉक्टरने याविषयी आपल्या जबाबात पहिल्या पानावर ओळ क्रमांक 21 ते 31 यावर हे स्पष्ट नमूद केले आहे.
2 - डॉक्टरच्या जबाबात खासदारांनी 'आपण बीडचे असल्याने आरोपीला फिट देत नाही', असा उल्लेख केल्याचे नमूद आहे.
3 - दुसरा पुरावा म्हणजे फलटण जेएमएफसी कोर्टात दाखल झालेल्या खटल्याची माहिती सांगणारा हा फोटो. वरील आरोपी चन्ने याच्या विरोधात स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युल लिमिटेड, उपळवे या कंपनीने दावा दाखल केला होता. ज्याचा Filing number SCC/2433/2024 तर Case Registration Number SCC/1883/2024 हा आहे. ही स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युल कंपनी निंबाळकर यांच्या मालकीची आहे, हे निंबाळकर यांच्या प्रोफाईलवरच नमूद आहे.
4 - डॉक्टरला फोनवर बोलण्यासाठी दबाव टाकणारे दोन पीए म्हणजे राजेंद्र शिंदे आणि रोहित नागटीळे.
हेही वाचा: Pune Jain Land Row : रवींद्र धंगेकर मोहोळांना म्हणाले पक्ष आदेशानुसार आता एकतर जैन मंदिर वाचवा नाहीतर स्वतःचे मंत्रीपद.. धंगेकरांनी ट्विट करत वातावरण पुन्हा तापवलं
पुढे, दानवे म्हणाले की, 'आता पोलिसांनी तपासात डीवायएसपी राहुल धस आणि पी.आय. अनिल महाडिक यांचा काय सहभाग होता हे स्पष्ट करावे, नाहीतर मला हे सांगावं लागेल'. यानंतर अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवरही जोरदार टीका केली. 'एका कर्तव्यदक्ष डॉक्टरच्या मृत्युची सरकारला काहीच किंमत नाही. हे असे सरकार आहे, जे चुकीचे काम करणाऱ्यांना पाठिंबा देते. देवाभाऊंच्या सरकारमध्ये कायद्याची जाणीव उरलेली नाही आणि महिलांचा सतत अपमान केला जातो', असे त्यांनी म्हटले आहे.
फलटण प्रकरणाचा तपास आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे आणि दानवे यांच्या पोस्टनंतर या प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सातारा दौऱ्यात या प्रकरणावर काय भूमिका घेतली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.