Amit Shah: ‘गुजरातमध्ये हिंदी बोलली जात नाही, गुजरातीच बोलली जाते’; अमित शाहांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

मुंबईतील अखिल भारतीय राजभाषा संमेलनात अमित शाह यांनी गुजरातमध्ये गुजराती भाषा बोलली जाते, असे सांगितले. हिंदीमुळे राष्ट्रीय स्तरावर संवाद साधण्यास मदत झाल्याचेही त्यांनी नमूद केले

Amit Shah: ‘गुजरातमध्ये हिंदी बोलली जात नाही, गुजरातीच बोलली जाते’; अमित शाहांचं मोठं विधान,  नेमकं काय म्हणाले?

हिंदी दिवस आणि सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाच्या निमित्ताने नवी मुंबईतील वाशी येथे देशभरातून भाषा आणि प्रशासन क्षेत्रातील मान्यवर एकत्र आले आहेत. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदी आणि मातृभाषांबाबत आपली भूमिका मांडताना गुजरातचा विशेष संदर्भ दिला. “मी गुजरातमधून येतो. गुजरातमध्ये हिंदी बोलली जात नाही, गुजराती भाषा बोलली जाते,” असे शाह यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

आपल्या भाषणात अमित शाह यांनी स्वतःच्या राजकीय प्रवासाचा दाखला देत भाषेच्या महत्त्वावर भाष्य केले. राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची जबाबदारी मिळाल्यानंतर वेगवेगळ्या भागात संवाद साधण्याची वेळ आली. त्यावेळी हिंदी समजत आणि बोलता येत असल्याने आपल्याला काम करताना अडचण आली नाही, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, विविध राज्यांमध्ये काम करताना संपर्कासाठी एखाद्या सामायिक भाषेची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.

याचवेळी त्यांनी मातृभाषेच्या वापरावरही भर दिला. देशातील प्रत्येक प्रदेशाची स्वतःची भाषा, संस्कृती आणि भाषिक ओळख आहे. त्यामुळे हिंदीचा प्रसार करताना स्थानिक भारतीय भाषांकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी भूमिका या संमेलनाच्या व्यापक चर्चेतही मांडली जात आहे. राजभाषा संमेलनाचा उद्देश हिंदीला प्रशासन आणि संपर्कासाठी अधिक प्रभावी बनवण्यासोबतच भारतीय भाषांमध्ये समन्वय वाढवणे हा आहे.

अमित शाह यांनी आपल्या भाषणात विनोबा भावे यांचाही संदर्भ दिला. विनोबा भावे यांनी हिंदीच्या माध्यमातून देशातील विविध भागांमध्ये जाऊन आपले विचार आणि सामाजिक संदेश पोहोचवला होता, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे हिंदी ही केवळ एका प्रदेशापुरती मर्यादित भाषा न राहता वेगवेगळ्या भाषिक समूहांमध्ये संवादाचे माध्यम ठरू शकते, असा मुद्दा त्यांनी मांडला

नवी मुंबईतील या दोन दिवसीय संमेलनात देशभरातील सुमारे सात हजार अधिकारी, राजभाषा कर्मचारी, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होत आहेत. हिंदीचा प्रशासकीय वापर, भारतीय भाषांमधील अनुवाद, तंत्रज्ञानाच्या मदतीने भाषिक संवाद आणि हिंदीचा संपर्कभाषा म्हणून विकास यावर कार्यक्रमात चर्चा होत आहे.

या संमेलनादरम्यान हिंदी शब्दकोश, ‘भारती’ मोबाईल अॅप आणि पुण्यातील भाषा डेटा सेंटर यांसारख्या उपक्रमांनाही महत्त्व दिले जात आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय भाषांमध्ये संवाद अधिक सुलभ करण्यावर सरकारचा भर असल्याचे या उपक्रमांतून दिसून येते.

दरम्यान, अमित शाह यांच्या “गुजरातमध्ये हिंदी बोलली जात नाही, गुजराती बोलली जाते” या विधानामुळे सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. एका बाजूला हिंदीला संपर्कभाषेच्या भूमिकेत पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू असताना दुसऱ्या बाजूला प्रादेशिक भाषांचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे. त्यामुळे मुंबईतील राजभाषा संमेलनात अमित शाह यांनी मांडलेली ही भूमिका आगामी काळात भाषेच्या मुद्द्यावरच्या चर्चेला नवे वळण देते का, याकडे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number