अमरावती: अमरावतीकरांसाठी 16 एप्रिल 2025 हा दिवस ऐतिहासिक आहे कारण अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अमरावती विमानतळाचं भव्य लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. उद्घाटनादरम्यान लगेचच 72सीट्स असलेलं पहिलं एटीआर विमान विमानतळावर यशस्वीरित्या उतरलं आणि परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. उद्घाटन सोहळ्याला दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, महायुतीतील नेते आणि अमरावतीचे खासदार व आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांमध्ये पहिल्या उड्डाणाबाबत विशेष उत्सुकता दिसून आली.
या ऐतिहासिक उद्घाटनाच्या निमित्ताने आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली जुलैपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या फ्लाइंग ट्रेनिंग सेंटरची. या प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावतीला देशात एक नवीन ओळख मिळणार आहे. एअर इंडियाच्या सहकार्याने हे केंद्र उभारले जात असून, यामुळे स्थानिक युवकांना करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. केंद्रीय वाहतूक मंत्री, राज्याचे मंत्री आणि विरोधी पक्षांचेही नेते या सोहळ्याला उपस्थित होते, हे विशेष.
सध्या अमरावती विमानतळावरून केवळ मुंबईसाठीच विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. या विमानतळावरून सध्या एटीआर-७२ सारखी मध्यम आकाराची विमानेच उड्डाण घेऊ शकतात. दिल्लीसारख्या लांब पल्ल्याच्या सेवांसाठी मात्र आणखी तयारी आवश्यक आहे. लवकरच सुरू होणाऱ्या टेक्सटाईल पार्कच्या पार्श्वभूमीवर सुरत व अहमदाबादसारख्या औद्योगिक शहरांसोबत हवाई जोडणी होण्याची शक्यता आहे. हे सर्व घडत असताना अमरावतीच्या आकाशाला आता नव्या उंचीची दिशा मिळाली आहे.