अमरावती: अमरावती शहरात 54 वर्षीय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कदीर यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले अब्दुल कलाम हे 20 जून रोजी ड्युटी संपवून दुचाकीवरून घरी परतत होते. याच दरम्यान, पाच ते सहा आरोपींनी चारचाकीने त्यांचा पाठलाग करत सुरुवातीला त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर जमिनीवर पडलेल्या कलाम यांच्यावर चाकूने सलग 10 पेक्षा जास्त वार करत त्यांची हत्या केली.
हेही वाचा: मराठा आरक्षणासाठी रणसंग्राम; 29 ऑगस्ट रोजी मुंबईत निर्णायक लढा
पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून, त्यापैकी दोन आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. प्राथमिक चौकशीत ही हत्या अपघातासारखी भासवण्यात आली होती. मात्र तपासात सत्य उघडकीस आले की, ही हत्या सूडभावनेतून केली गेली होती. अब्दुल कलाम यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या भावाच्या पैशासंबंधी झालेल्या वादात मध्यस्थी केली होती. त्याचा राग मनात धरूनच आरोपींनी हा कट रचला.
या घटनेमुळे अमरावती पोलिस दलात आणि स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची अशा अमानुष पद्धतीने हत्या होणे हे अत्यंत दुःखद असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलीस अधिक तपास करत असून आणखी आरोपींचा शोध सुरू आहे.