Anagar : आजच्या डिजिटल युगात मोबाईल, टीव्ही आणि सोशल मीडियाशिवाय जीवनाची कल्पनाच करता येत नाही. मात्र याच तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे माणूस माणसापासून दूर जात असल्याची चिंता वाढत आहे. यावर तोडगा म्हणून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर गावाने एक धाडसी आणि प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. दररोज संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत संपूर्ण गावात मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवण्याचा संकल्प करण्यात आला असून, या निर्णयाची चर्चा आता राज्यभर सुरू आहे.
अनगर नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्ष प्राजक्ता पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. केवळ उत्सवापुरता न राहता, समाजाच्या मानसिक आणि सामाजिक आरोग्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. तंत्रज्ञानाच्या अतिरेकामुळे विशेषतः मुलांवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
सतत स्क्रीनसमोर राहिल्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येणे, एकाग्रता कमी होणे, झोपेच्या वेळा विस्कळीत होणे आणि शारीरिक हालचालींचा अभाव यासारख्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यावर उपाय म्हणून ‘डिजिटल उपवास’ ही संकल्पना अनगरमध्ये प्रत्यक्षात उतरवली जात आहे. या दोन तासांत मुले मोबाईलऐवजी मैदानी खेळ, वाचन, चित्रकला किंवा इतर सर्जनशील उपक्रमांकडे वळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
फक्त मुलांचाच नाही, तर कुटुंबव्यवस्थेवरही या निर्णयाचा सकारात्मक परिणाम होणार आहे. टीव्हीवरील मालिका, मोबाईलवरील रील्स आणि सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या घरांमध्ये संवाद कमी झाला होता. आता मात्र हीच वेळ कुटुंबीयांसोबत गप्पा मारण्यासाठी, वडीलधाऱ्यांचे अनुभव ऐकण्यासाठी आणि नातेसंबंध अधिक घट्ट करण्यासाठी वापरली जाणार आहे. पिढ्यान् पिढ्यांतील संवाद पुन्हा जिवंत होण्याची ही मोठी संधी आहे.
नगराध्यक्ष प्राजक्ता पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गावाच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. रस्ते, पाणी, वीज यासोबतच बौद्धिक, मानसिक आणि सामाजिक विकासही तितकाच महत्त्वाचा असल्याचं त्या सांगतात. जागतिक पातळीवरील अनेक अभ्यासांमध्ये ‘डिजिटल डिटॉक्स’ तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
अनगरच्या ग्रामस्थांनी एकमताने या निर्णयाला पाठिंबा दिला असून, गावात एक नवी शिस्त आणि सकारात्मक बदलाची सुरुवात झाली आहे. हा उपक्रम केवळ एका गावापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे. डिजिटल युगातही विचारपूर्वक बदल घडवता येतो, हे अनगर गावाने कृतीतून दाखवून दिलं आहे.