Anjali Damania : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाशिकचा तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली. खरात याला ‘भोंदू’ म्हणण्यापेक्षा ‘विकृत बाबा’ म्हणावे, अशी विनंती त्यांनी माध्यमांना केली. यावेळी त्यांनी खरातच्या अघोरी कृत्यांचा पर्दाफाश करणारी एक खळबळजनक ऑडिओ क्लिप ऐकवली, ज्यामध्ये रुपाली चाकणकर एका कार्यक्रमात बोलताना दिसत आहेत.
शेकडो महिलांचे लैंगिक शोषण?
अशोक खरातवर लैंगिक शोषणाचे अत्यंत धक्कादायक आरोप करताना दमानिया म्हणाल्या की, ही केवळ एक-दोन प्रकरणे नसून शेकड्यांनी महिला यात भरडल्या गेल्या आहेत. पोलिसांना केवळ 58 व्हिडिओ मिळाले असले, तरी डिलीट करण्यात आलेला मोठा डेटा रिकव्हर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सायबर एक्सपर्टच्या मदतीने हा डेटा समोर आल्यास प्रकरणाची व्याप्ती मोठी असेल. धर्माचा वापर करून महिलांची फसवणूक करणाऱ्या या व्यक्तीला तातडीने कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा
अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत एक ऑडिओ क्लिप ऐकवली. “रुपाली चाकणकर जे बोलल्या, ते लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे,” असे म्हणत त्यांनी चाकणकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खरातला पाठीशी घालण्याचे किंवा हे प्रकरण दाबण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, चाकणकर यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांना अटक करावी, अशी आक्रमक मागणी दमानिया यांनी केली आहे.
सुषमा अंधारे यांच्या दाव्यांचा संदर्भ
यावेळी दमानिया यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या दाव्यांचाही उल्लेख केला. खरातने स्वतःची अनामिका (बोट) कापून घेतल्याचे आणि तीन महिने त्यावर बँडेज असल्याचे जे नाटक केले, त्यावरून त्याची मानसिकता दिसून येते, असे त्या म्हणाल्या. साडी नेसून, देवाच्या पाया पडून सभ्यपणाचा आव आणणारी ही माणसे प्रत्यक्षात किती विकृत आहेत, हे त्यांच्या व्हिडिओंवरून स्पष्ट होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा – Ashok Kharat Case : खरातची बातमी छापल्यानंतर रुपाली चाकणकरांचा मला फोन; पत्रकाराच्या दाव्याने खळबळ
जनतेला कळकळीचे आवाहन
“धर्माचा वापर करून चालवल्या जाणाऱ्या या घाणेरड्या प्रकारांमध्ये महिलांनी आणि पुरुषांनी अडकू नये,” असे आवाहन दमानिया यांनी हात जोडून केले. या प्रकरणातील सर्व खुलासे जोपर्यंत बाहेर येत नाहीत, तोपर्यंत आपण हा लढा थांबवणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच, गृहखात्याने या प्रकरणात कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्ष तपास करावा, अशी विनंतीही त्यांनी केली.