Deepak Sawant Disqualified: महाराष्ट्राच्या राजकारणात एकीकडे ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मुंबईत आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक दीपक सावंत यांचे नगरसेवकपद अखेर रद्द करण्यात आले आहे. त्यांचे जात प्रमाणपत्र (Caste Certificate) वैध नसल्याचा निर्णय जात पडताळणी समितीने दिला असून, यामुळे ठाकरे गटाला मुंबईत खिंडार पडले आहे.
जात प्रमाणपत्र ठरले अवैध; नगरसेवकपदावर गदा
दीपक सावंत यांनी निवडणुकीदरम्यान सादर केलेले जात प्रमाणपत्र कायदेशीर तपासणीत अवैध ठरले आहे. जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांचे नगरसेवकपदही तातडीने रद्द करण्यात आले आहे. आधीच अनेक बडे नेते आणि खासदार पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांनी ठाकरे गट चिंतेत असताना, मुंबई महापालिकेतील हा अंतर्गत धक्का पक्षाची डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे.
हेही वाचा – Ramdas Kadam : खासदार फुटीवरून रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, ‘ठाकरे गटात फक्त तिघेच…’
महापालिकेतील संख्याबळ घसरले; 65 वरून 64 वर
मुंबई महानगरपालिका सभागृहात दीपक सावंत यांच्या अपात्रतेचा निर्णय अधिकृतपणे मंजूर झाल्यानंतर, त्याचा थेट फटका ठाकरे गटाच्या संख्याबळाला बसणार आहे. या अपात्रतेमुळे ठाकरे गटाची पालिकेतील एकूण सदस्यसंख्या आता 65 वरून थेट 64 वर येईल. एका जागेच्या नुकसानामुळे पालिका सभागृहात पक्षाची ताकद किंचित कमी होणार आहे.
पालिकेतील महत्त्वाच्या समित्यांचे समीकरण बदलणार
दरम्यान, दीपक सावंत यांच्या अपात्रतेचा थेट परिणाम मुंबई महापालिकेतील विविध वैधानिक आणि प्रभाग समित्यांच्या संख्याबळावर होण्याची शक्यता आहे. पालिकेतील सर्वात शक्तिशाली मानली जाणारी स्थायी समिती, प्रभाग समिती आणि इतर महत्त्वाच्या समित्यांमध्ये ठाकरे गटाला मिळालेल्या प्रतिनिधित्वाच्या समीकरणात आता मोठे फेरबदल होऊ शकतात. एका सदस्याच्या कमतरतेमुळे विरोधी पक्षांना किंवा सत्ताधाऱ्यांना या समित्यांमध्ये आपले वर्चस्व वाढवण्याची आयती संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.