पंढरपूर : गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर चर्चा सुरु आहेत. यावर रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी भाष्य केले आहे. आम्ही मराठी माणसासाठी काम करत नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे. शिवसेनेतील प्रवेशामुळे उद्धव ठाकरे हवालदिल असल्याचे म्हणत गोगावले यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावलेंनी विठ्ठलाला साकडं घातलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. एकनाथ शिंदेनी बाळासाहेबांचं नाव उंचावण्याचं काम केलंय, शिवसेनेत होत असलेल्या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे हवालदिल झाले आहेत, असंही भरत गोगावले यांनी यावेळी म्हटलं आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भरत गोगावले पंढरपूरमध्ये बोलत होते.
हेही वाचा : Imtiaz Jaleel vs Sanjay Shirsat controversy: इम्तियाज जलील विरुद्ध संजय शिरसाट वाद पेटला
एकनाथ शिंदेंविषयी कोणी वेडंवाकडं बोलत असेल तर त्याच्यापेक्षा कोणी मूर्ख असू शकत नाही. एक इंचही शिंदेंनी बाळासाहेबांचं नाव कमी केले असेल तर ठाकरेंनी आम्हाला दाखवावं. आम्ही चार वेळा माफी मागतो. बाळासाहेबांचे नाव उंचावण्याचं काम साहेबांच्या नावाने संघटना उंचीवर नेण्याचं काम आता जर कोणी करत असेल तर ते एकनाथ शिंदे आहेत. शिवसेनेत होत असलेल्या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे हवालदिल झाले आहेत. त्यामुळेच ठाकरे गटाकडून शिंदेंवर टीका केली जात आहे असे मंत्री भरत गोगावले यांनी पंढरपूर येथे माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
ठाकरे बंधू एकत्र येणाच्या चर्चांवरही त्यांनी भाष्य केले आहे. आम्ही जे काम करतोय ते मराठी माणसासाठी नाही का? हिंदुत्वासाठी नाही का? आम्ही मराठी माणसाला उत्तर प्रदेशात पाकिस्तानात घालवतोय का? असे सवाल यावेळी भरत गोगावले यांनी केले आहेत. तसेच बाळासाहेबांच्या विचारानुसार आम्ही मराठी माणसासाठी काम करतोय असेही त्यांनी प्रतिपादन केले आहे.