Tuesday, February 17, 2026 08:33:42 PM

Ajit Pawar: महापालिकेत सुफडा साफ होताच अजित पवार ॲक्शन मोडमध्ये; पराभवानंतर थेट...

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दारुण पराभवाने खचून न जाता अजित पवारांनी दुसऱ्याच दिवशी आपला 'मास्टर प्लॅन' बदलत मोठी खेळी खेळली आहे.

ajit pawar महापालिकेत सुफडा साफ होताच अजित पवार ॲक्शन मोडमध्ये पराभवानंतर थेट

Ajit Pawar: महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना बसलेल्या भीषण धक्क्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या अजित पवार यांना मतदारांनी सपशेल नाकारले आहे. मात्र, या दारुण पराभवाने खचून न जाता अजित पवारांनी दुसऱ्याच दिवशी आपला 'मास्टर प्लॅन' बदलत मोठी खेळी खेळली आहे.

काका-पुतण्यांची तातडीची बैठक; 'गोविंदबागेत' खलबतं

निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय समीकरणं वेगाने बदलली आहेत. आज सकाळीच अजित पवार यांनी बारामतीतील 'गोविंदबाग' निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत केवळ काका-पुतणेच नव्हे, तर सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि दत्तात्रय भरणे यांसारखे दिग्गज नेते उपस्थित होते. महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढूनही यश न मिळाल्याने आता पुढची दिशा काय असावी, यावर या बैठकीत गहन चर्चा झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा - Mumbai Mayor Election : मुंबई महापालिकेवर भाजपचा विजयी झेंडा! महापौरसाठी 'हे' नाव जोरदार चर्चेत

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती एकत्र लढणार

या भेटीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बैठकीतील महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले, महानगरपालिका निवडणुकीत आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही, हे मान्य आहे. या पराभवाचे आम्ही आत्मचिंतन करू. मात्र, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने एकत्र उतरणार आहेत.

हेही वाचा - Pune Election Result Analysis: पुणेकरांनी 'व्हायरल' नेत्यांची हवाच काढून घेतली ; तात्या, भाऊ अन् ताईंचा वाजला बँड

वेळेचा अभाव ठरला घातकी?

दरम्यान, अजित पवार आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकीत युतीची बोलणी करण्यातच बराच वेळ वाया गेला, ज्याचा थेट परिणाम प्रचारावर झाला. हीच चूक टाळण्यासाठी अजित पवारांनी आता निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच कामाला सुरुवात केली आहे.


सम्बन्धित सामग्री