Monday, March 09, 2026 02:57:45 AM

Godavari River Gold : गोदावरीत 'सोन्यासाठी' संघर्ष! पाणी कमी होताच सोनं शोधण्यासाठी नागरिकांची झुंबड; नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोदावरी नदीचं पाणी कमी झाल असून या उघड्या पडलेल्या पात्रात आता 'सोनं' शोधण्यासाठी शेकडो लोक गाळात उतरले आहेत.

godavari river gold  गोदावरीत सोन्यासाठी संघर्ष पाणी कमी होताच सोनं शोधण्यासाठी नागरिकांची झुंबड नेमकं प्रकरण काय

पैठण गोदावरी नदी:  माणूस पोटासाठी काय करेल याचा नेम नाही. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोदावरी नदीचं पाणी कमी झाल असून या उघड्या पडलेल्या पात्रात आता 'सोनं' शोधण्यासाठी शेकडो लोक गाळात उतरले आहेत. मृत व्यक्तींच्या अस्थि विसर्जनासोबत वाहून गेलेले सोन्या-चांदीचे मणी शोधण्यासाठी महिला आणि तरुण आपला जीव धोक्यात घालत आहेत. काय आहे हा प्रकार? जाणून घ्या... 

हेही वाचा- Crime News: "तुझी आई होण्याची लायकी ठेवणार नाही" डेटिंग ॲपवरील पार्टनरने 19 वर्षीय तरुणीसोबत ओलांडल्या क्रूरतेच्या सिमा
पैठणच्या गोदावरी तटाजवळ श्रद्धा आणि श्रमाचा विचित्र मेळ पाहायला मिळतो आहे. नाथषष्ठीसाठी पाणी कमी होताच या घाटावर एक वेगळीच स्पर्धा सुरू झाली आहे. ती म्हणजे सोन्याचे कण वेचण्याची. हे केवळ सोनं शोधणं नाही, तर हा पोटाचा संघर्ष आहे. दररोज या ठिकाणी दशक्रिया विधी पार पडतात. परंपरेनुसार मृत व्यक्तीसोबत ठेवलेलं सोनं-चांदी राखेसोबत विसर्जित केलं जातं. आता हेच दागिने, मणी किंवा अंगठ्या शोधण्यासाठी महिला आणि तरुण भर उन्हात गाळात उतरले आहेत.


स्थानिकांनी सांगितले की, ते सकाळी 8 वाजल्यापासून इथे आहेत. हाताला काम नाही म्हणून हे करावं लागतं. दिवसभरात 500-600 रुपये सुटतात, त्यातून घर चालतं. हाताला काचा लागू नयेत म्हणून बोटांना टेप लावतो. हाताच्या बोटांना साधा 'चिकट टेप' लावून, काचांच्या तुकड्यांतून हे लोक सोन्याचे कण वेचतात. 500 रुपयांच्या रोजंदारीसाठी चाललेला हा 'जीवघेणा शोध' प्रशासकीय अनास्था आणि वाढत्या बेरोजगारीचं विदारक दर्शन घडवत आहे.फक्त स्थानिक नाही तर बाहेर जिल्ह्यातून देखील लोक याठिकाणी येतात, वर्षभर हा संघर्ष सुरू असतो, याठिकाणी फक्त सोनं शोधणारे नाही तर, खरेदी करणारे देखील उभे असतात अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिल्या.

हेही वाचा- Spicejet Emergency Landing: हवेत इंजिन फेल, आगीच्या ठिणग्या अन् प्रवाशांचा आक्रोश...दिल्ली विमानतळावर 'स्पाइसजेट'चे थरारक लँडिंग
ज्या हातांना कारखान्यात किंवा शेतात असायला हवं होतं, ते हात आज 500 रुपयांसाठी जीव धोक्यात घालून चिखल उपसत आहेत. श्रद्धेच्या पैठण नगरीत पोटाच्या खळगीसाठी सुरू असलेला हा 'सोनियाचा संघर्ष' व्यवस्थेला चपराक लगावणारा आहे.


सम्बन्धित सामग्री