मुंबई: राज्यभरात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. “आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक समृद्धीची सशक्त चळवळ आहे. गेली अनेक शतके पंढरपूरची वारी करणाऱ्या वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनाला दिशा देण्याचे, समृद्ध करण्याचे काम केले आहे.
धुळ्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची गर्दी
खान्देशात प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बाळदे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील भाविक दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले आहेत. पहाटे 4 वाजता विठ्ठल रुक्मिणी मातेला अभिषेक, पूजा आणि काकड आरती करत विष्णुसहस्र नाम जप, दिंडीसह अन्य सोपस्कार पार पडले.
हेही वाचा: मधुमेह असल्याने साखरेऐवजी गूळ खाताय? शुगरचं नाही तर डोक्याचा तापही वाढेल, जाणून घ्या...
चांदवडमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न
आषाढी एकादशीनिमित्त नाशिकच्या चांदवडमधील भाटगाव येथील नूतन माध्यमिक विद्यालयात चिमुकले शाळकरी वारकरी बनले. 'ग्रंथ दिंडी, वृक्ष दिंडी' अभंग, ओवी, भक्तीगीत सादर करत गावकाऱ्यांसह आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न झाला. विठ्ठलमय वातावरणात प्राथमिक शाळेतील चिमुकल्या वारकरीसह, माध्यमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या ठेक्यावर रिंगण सोहळ्यात सहभाग घेत विठू नामाचा जयघोष केला.
राजधानी दिल्लीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढीचा उत्साह
आषाढी एकादशीनिमित्त राजधानीत आयोजित 5 व्या सांकेतिक वारीत शेकडो दिल्लीकर मराठी बांधव न्हाऊन निघाले. दिल्लीतील रस्ते विठुरायाच्या नामस्मरणात दंग झाले होते. पारंपारिक वेशभूषा, फुगड्या घालत विठ्ठलाच्या भक्तीभावात तल्लीन होऊन ही वारी पार पडली. दिल्लीतील आर.के.पुरम सेक्टर-6 येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढीचा उत्साह पाहायला मिळाला.