आषाढी वारीदरम्यान सासवड–जेजुरी मार्गावर रविवारी भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर चार महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जेजुरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सासवड–जेजुरी मार्गावरील बेलसर टोलनाक्यापासून जेजुरीच्या दिशेने सुमारे ५०० मीटर अंतरावर, हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर हा अपघात झाला. लोहा (जिल्हा नांदेड) येथील रंगनाथ महाराज पोखरबिसीकर यांच्या दिंडीचा ट्रक आणि सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील दिंडीतील महिला वारकरी यांच्यात हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या भीषण दुर्घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच चार महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने जेजुरी येथील आयसीयू सुविधा असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच पंचनामा आणि अन्य कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
आषाढी वारीसाठी राज्याच्या विविध भागांतून हजारो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना घडलेल्या या दुर्घटनेमुळे वारकरी संप्रदायात शोक व्यक्त केला जात आहे. अनेक भाविकांनी जखमी वारकऱ्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे.
दरम्यान, या अपघातानंतर वारी मार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वारकऱ्यांची मोठी गर्दी लक्षात घेता वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही पुढे येत आहे.