मुंबई: राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे अॅड. असीम सरोदे यांच्या वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द केली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने सोमवारी हा निर्णय घेतला. या निर्णयाच्या विरोधात बार कौन्सिलमध्ये अपील करणार असल्याचे सरोदे यांनी सांगितले.
गेल्या 25 वर्षांपासून अन्यायग्रस्त लोकांना मी मदत करतो, लोकांसाठी विविध विषयात काम केले आहे. न्याय व्यवस्थेची प्रतिष्ठा वाढली पाहिजे, न्याय व्यवस्थेवर विश्वास वाढला पाहिजे म्हणून मी काम केले. पण राज्यपालांना मी फालतू म्हणालो म्हणून माझी सनद रद्द करण्याचा निर्णय घेतला पण त्यावेळी कोश्यारी हे राज्यपाल नव्हते, असे सरोदे यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच जर मी चुकलो असेल तर सामान्य नागरिकांची माफी मागेल, असेही त्यांनी म्हटले.
शिवसेनेच्या केसच्या आधी मुद्दाम निर्णय घेतला का?
12 ऑगस्ट 2025 रोजी ऑर्डर काढली. ऑर्डर मला आज मिळाली. तेव्हा निर्णय झाला तर मग आज ऑर्डर का हातात दिली? या निर्णयाच्या विरोधात मी बार कौन्सिलमध्ये अपील करणार आहे. मी राजकीय पक्षाचा नाही मात्र मी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून केस लढवतो आहे. येत्या 12 तारखेला केस आहे मग आत्ताच हा निर्णय मुद्दाम दिला का? असा प्रश्नही सरोदेंनी केला आहे.
हेही वाचा: Asim Sarode: अॅड. असीम सरोदेंना मोठा धक्का, बार कौन्सिलने केली मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?
असा निर्णय होईल अशी कधीच आशा नव्हती. मला प्रचंड वाईट वाटतंय. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडून हा निर्णय देण्यात आला. माझ्या विरोधात तक्रार करणारा राजेश दाभोलकर हा भाजपचा कार्यकर्ता आहे. त्याचे अनेक भाजप नेत्यांसोबत फोटो आहेत, असे सरोदे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी जनता न्यायालय हा कार्यक्रम घेतला होता तेव्हा आमदार अपात्र याविषयावर बोललो होतो. भगत सिंह कोश्यारी हे फालतू आहेत असं मी म्हणालो मी मान्य करतो. राहुल नार्वेकर यांनी विश्वासघात केला हे सुद्धा मी म्हणालो. पण त्यावेळी कोश्यारी राज्यपाल पदावर नव्हते, असे सरोदे यांनी म्हटले.