नवी मुंबई: मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर कापणारा देशातील सर्वात लांब सागरी पूल 'अटल सेतू' आता एका नव्या उंचीवर पोहोचणार आहे. या मार्गाची उपयुक्तता वाढवण्यासाठी सिडकोने हाती घेतलेल्या नवी मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या जोडणीला अखेर 'तटीय नियमन क्षेत्र' (Coastal Regulation Zone, CRZ) प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. यामुळे गेल्या काही काळापासून पर्यावरणाच्या तांत्रिक पेचात अडकलेला हा प्रकल्प आता खऱ्या अर्थाने 'सुस्साट' धावण्यासाठी सज्ज झाला असून, या निर्णयामुळे उरण, पनवेल आणि दक्षिण मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पर्यावरणाचा अडथळा दूर; विकासाचा मार्ग मोकळा
अटल सेतूचे बांधकाम सुरू असताना सिडकोचा कोस्टल रोड प्रकल्प प्राथमिक अवस्थेत होता, परिणामी या दोन महामार्गांची थेट जोडणी त्यावेळी होऊ शकली नव्हती. मात्र, आता सिडको उरण तालुक्यातील गव्हाण गावाजवळ आणि शिवाजीनगर इंटरचेंज परिसरात सहा अत्याधुनिक रॅम्प उभारून ही जोडणी पूर्ण करणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 936 खारफुटींच्या झाडांची कत्तल होणार असल्याने पर्यावरण विभागाने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 'निसर्गाचा समतोल आणि प्रगतीची गरज' या दोन टोकांवर हा प्रकल्प रखडला होता; पण आता काही अटी आणि शर्तींसह CRZ ने हिरवा कंदील दिल्याने कामाला वेग येईल.
हेही वाचा: BJP Party : दिल्लीच्या तख्तावर नबीन, तर मैदानात महाराष्ट्राचे वाघ; विनोद तावडे आणि आशिष शेलार यांचे राष्ट्रीय राजकारणात प्रमोशन
असा असेल 'स्मार्ट' कनेक्टिव्हिटीचा आराखडा
हा प्रकल्प केवळ रस्ता नसून अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना ठरणार आहे. सुमारे 3.5 हेक्टर क्षेत्रावर विस्तारलेल्या या प्रकल्पात 32 स्ट्रक्चरल मॉड्यूल्सचा समावेश आहे. 75 मीटर लांबीचे प्रत्येक स्पॅन एक मीटर व्यासाच्या मजबूत 'बोअर्ड कास्ट-इन-सेतु पाईल्स'वर उभे केले जातील. विशेष म्हणजे, जमिनीच्या पोटातील खडकात खोलवर सॉकेटिंग करून या पुलाची मजबूती काळाच्या कसोटीवर उतरणारी असेल. न्हावा आणि उरण रोडच्या सानिध्यात असलेला हा मार्ग खारकोपर रेल्वे स्थानकालाही बळकटी देणार असून, रस्ते आणि रेल्वे यांचे एक अभेद्य जाळे विणले जाणार आहे.
प्रवासाची नवी व्याख्या: दीड तासाचा फेरा आता 15 मिनिटांत
हा कनेक्टर पूर्ण झाल्यावर केवळ वेळच वाचणार नाही, तर इंधनाचीही मोठी बचत होईल. जेएनपीए (JNPA) बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई या त्रिकोणी प्रवासात लागणारा सुमारे दीड तासांचा वेळ आता अवघ्या 15 ते 20 मिनिटांवर येण्याची शक्यता आहे. 'वेळ आणि पैसा' या सूत्राप्रमाणे हा प्रकल्प नवी मुंबईच्या रिअल इस्टेट आणि औद्योगिक विकासाला चारचाँद लावणारा ठरेल.
पर्यावरण संवर्धनाचीही घेणार काळजी
प्रकल्पाचा सुमारे 936 खारफुटींवर परिणाम होणार असला, तरी सिडकोने आपल्या पर्यावरण मूल्यांकन अहवालात नुकसान भरपाईसाठी कंबर कसली आहे. ज्या भागात खारफुटीची हानी होईल, त्याच्या बदल्यात अन्यत्र मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि संवर्धनाचे उपाय राबवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आता अंतिम परवानगीसाठी हा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे धाडण्यात आला असून, तिथे मोहोर लागताच प्रत्यक्ष कामाचा नारळ फुटणार आहे.
हेही वाचा: Pune ZP Election 2026 : राजकारण तापलं! दत्तात्रय भरणेंचा मुलगा अन् हर्षवर्धन पाटलांची लेक; एकाच चिन्हावर लढणार निवडणूक