अमरावती: राज्यात विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना शिंदे गट आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यात संभाव्य युती तसेच पक्ष विलिनीकरणाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
बच्चू कडू यांनी मिश्किल शैलीत माध्यमांचे आभार मानत, “मीडियामुळेच मला प्रसिद्धी मिळाली. मी विधान परिषदेचा सदस्य होणार, ही बातमीही माध्यमांमधूनच पसरली,” असे सांगितले. “मलाही याची कल्पना नव्हती, त्यामुळे सर्व माध्यमांचे आभार,” असे ते म्हणाले.
त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आभार मानले. “सत्तांतराच्या वेळी मी बदनाम झालो, पण त्यानंतर मला दिव्यांग मंत्रालय देण्यात आले. त्या खात्यात मी चांगले काम केले. एकनाथ शिंदे हे शब्द पाळणारे नेते आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत बोलताना कडू म्हणाले, “जर एकनाथ शिंदे यांनी माझ्या नावाचा विचार केला, तर तो शेतकरी आणि दिव्यांग बांधवांचा विजय असेल.” मात्र त्यांनी स्पष्ट केले की, आपण केवळ पदासाठी युती करणारे नाही. “ऑफर आली तरी आम्ही विचार करूनच निर्णय घेऊ,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
पक्ष विलिनीकरणाच्या चर्चांवर बोलताना बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. “प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करणार नाही. युतीचा निर्णय घेतला, तर तो फक्त मुद्द्यांवर आधारित असेल. आमचे मुद्दे मान्य झाले तरच आम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.
एकूणच, बच्चू कडू यांनी त्यांच्या स्पष्टवक्तेपणातून राजकीय समीकरणांवर पडदा उघडला असून, त्यांच्या या भूमिकेमुळे आगामी विधान परिषद निवडणुकांमध्ये नवे राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.