नाशिक: नाशिकमधील राजकीय घडामोडींना वेग आला असून, भाजपने ठाकरे गटावर आणखी एक मोठा झटका दिला आहे. भाजप नेते सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महापालिकेतील म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना संघटना आता अधिकृतपणे भाजपात सामील झाली आहे. ही संघटना ठाकरे गटाची महत्त्वाची मानली जात होती.
सुधाकर बडगुजर हे या संघटनेचे अध्यक्ष असून, या संघटनेमध्ये सुमारे 2,700 कर्मचारी सदस्य आहेत. गेल्या काही वर्षांपासून ही संघटना ठाकरेंच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती. मात्र, सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा या संघटनेच्या कामकाजाला चालना दिली आहे.
हेही वाचा: संजय राऊतांवर केलेलं 'ते' वक्तव्य पडलं महागात; नितेश राणेंना कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी
बडगुजर यांनी स्पष्ट केलं की, 'या संघटनेचे सदस्य मला पाच वर्षांसाठी निवडून दिले आहेत. त्यामुळे मी आता भाजपात असल्याने ही संघटना देखील भाजपाच्या अंतर्गत चालणार आहे. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसारच या संघटनेचे कामकाज केले जाईल.' हे ठरवणं पक्षाचं नसून संघटनेच्या अंतर्गत प्रक्रिया आणि नेतृत्वावर आधारित असल्याचं बडगुजर यांनी अधोरेखित केलं. विशेष म्हणजे, या संघटनेवर पक्षाचे थेट नियम लागू होत नाहीत, मात्र नेतृत्व भाजपकडं गेल्यामुळे संपूर्ण संघटना आता भाजपाच्या छत्राखाली कार्यरत होणार आहे.
या घडामोडीमुळे ठाकरे गटाला नाशिकमध्ये संघटनात्मकदृष्ट्या मोठा फटका बसला आहे.