Bageshwar Baba Apologized: छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांनी अखेर नमती भूमिका घेतली आहे. राज्यभरातून व्यक्त होणारा संताप आणि शिवप्रेमींच्या तीव्र भावना लक्षात घेता, त्यांनी आपल्या विधानावर जाहीर माफी मागितली असून, “माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला गेला,” असे स्पष्टीकरण दिले आहे.
इतिहासाचा विपर्यास केल्याचा आरोप आणि वाढता वाद
नागपूरमधील एका कार्यक्रमात बागेश्वर बाबांनी असा दावा केला होता की, “छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि त्यांनी आपला राजपाट समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण केला होता.” या विधानामुळे इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडसह अनेक मराठा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. ठिकठिकाणी निदर्शने आणि आंदोलने झाल्यानंतर हे प्रकरण मोठ्या वादात सापडले होते.
बागेश्वर बाबांचा माफीनामा आणि स्पष्टीकरण
वाढता विरोध पाहून बागेश्वर बाबांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत आपली भूमिका मांडली आहे. “माझ्या विधानामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील, तर मी मनापासून माफी मागतो. महाराजांचा गुरुप्रती असलेला आदर आणि समर्पण मला मांडायचे होते, मात्र काही लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, ज्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या विचारातून आपण ‘हिंदूराष्ट्र’ संकल्पना स्वीकारली, त्या छत्रपती शिवरायांचा अवमान करणे स्वप्नातही शक्य नाही, असेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा – श्याम मानवांच्या बोलण्याने काही फरक पडत नाही…’; भूषण गवईंच्या समर्थनासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात
शिवप्रेमींना आवाहन आणि विकासावर भाष्य
संभाजी ब्रिगेड आणि सर्व शिवप्रेमींना उद्देशून ते म्हणाले, “आपण सर्वजण महाराजांचेच पाईक आहोत. आपण आपापसात लढलो, तर त्याचा फायदा तिसराच घेईल.” दरम्यान, याच वेळी त्यांनी देशाच्या प्रगतीवरही भाष्य केले. “देशाची प्रगती केवळ धर्माच्या नावावर होणार नाही, तर ती आर्थिक सुबत्ता, मोफत शिक्षण आणि दर्जेदार आरोग्य सुविधांमुळे होईल,” असे विचार त्यांनी मांडले. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रवादाकडे वळावे, असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.