मुंबई: देशभरात 29 एप्रिल ते 1 मे 2025 दरम्यान सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. या काळात भागवत श्री परशुराम जयंती, बसव जयंती, अक्षय तृतीया, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या सणांच्या निमित्ताने सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, या सुट्ट्या राज्यानुसार वेगवेगळ्या असणार असल्याने ग्राहकांनी स्वतःच्या राज्यातील बँकांच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासणी करावी.
30 एप्रिल रोजी कर्नाटक राज्यात बसव जयंती आणि अक्षय तृतीया निमित्त बँका बंद राहतील. बसव जयंती ही कर्नाटकातील संत व समाजसुधारक बसवेश्वर यांची जयंती म्हणून साजरी केली जाते. तसेच अक्षय तृतीया हा शुभ, समृद्धीचा प्रतीक मानला जाणारा सण आहे.
1 मे रोजी महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, बिहारसह काही राज्यांमध्ये बँका महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त बंद राहतील. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी 1960 साली बॉम्बे प्रेझिडेन्सीचे महाराष्ट्र व गुजरात अशा दोन वेगळ्या राज्यांत विभाजन झाले होते. त्याचीच आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. तसेच 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन असून, कामगारांचे हक्क आणि शोषणाविरोधातील जनजागृतीसाठी साजरा केला जातो.
हेही वाचा: अक्षय तृतीया 2025 : महाराष्ट्रात सोन्याचे दर कमी ..खरेदीसाठी सुवर्णसंधी
काय सुरू राहील?
या सुट्ट्यांदरम्यान बँकांच्या शाखा बंद राहतील, मात्र डिजिटल सेवा सुरू राहतील. नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग अॅप, यूपीआय (UPI), आणि एटीएम सेवांचा ग्राहकांना वापर करता येईल. मात्र, काही वेळा देखभालीसाठी सेवा बंद होण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांनी वेळोवेळी अपडेट तपासावेत. काही बँकांमध्ये एफडी आणि आरडी उघडण्यासारख्या सुविधा ऑनलाइन उपलब्ध असतील.
मे महिन्यात एकूण 12 बँक सुट्ट्या असणार आहेत. यामध्ये काही सुट्ट्या देशभर लागू असतील, तर काही केवळ विशिष्ट राज्यांमध्येच. त्यामुळे बँकेत प्रत्यक्ष जाण्याचे नियोजन करत असाल, तर त्या आधी सुट्टीची माहिती नक्की करून घ्या. सुट्ट्यांमुळे चेक क्लिअरिंग, व्यवहार प्रक्रिया यावर परिणाम होऊ शकतो.
अश्या वेळी ग्राहकांनी डिजिटल व्यवहाराला प्राधान्य द्यावे.