बारामती: नियतीच्या मनात नेमकं काय दडलंय, याचा थांगपत्ता कुणालाच नसतो. गेल्या महिन्यात, 28 जानेवारीला बारामतीजवळ झालेल्या एका दुर्दैवी विमान अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडती तोफ कायमची शांत केली. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह पाच जणांना या भीषण अपघातात त्यांचे प्राण गमवावे लागले. या एका घटनेने केवळ बारामतीच नव्हे, तर अवघा महाराष्ट्र सुन्न झाला. बारामतीकरांच्या डोळ्यांतील अश्रू अद्यापही सुकलेले नाहीत. मात्र, 'काळ कुणासाठी थांबत नाही' याप्रमाणे आता राजकीय चक्र आणि लोकशाहीची प्रक्रिया पुन्हा पुढे सरकू लागली आहे.
अजितदादांच्या अकाली एक्झिटमुळे बारामती विधानसभेची हक्काची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या मतदारसंघात पोटनिवडणुकीची तयारी आता वेगाने सुरू केली आहे. प्राप्त माहितीनुसार, आगामी 10 मार्च रोजी बारामती विधानसभेची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी या पोटनिवडणुकीचा बिगुल वाजू शकतो. दादांच्या पश्चात बारामतीचं राजकीय आणि सामाजिक नेतृत्व कोण करणार? या राज्यभर चर्चिल्या जाणाऱ्या प्रश्नावर आता एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे.
बारामतीचा गड अबाधित राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत विचारपूर्वक पाऊल उचलले आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच बारामतीच्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवार असतील, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या नुकत्याच पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सुनेत्रा वहिनींच्या नावावर एकमताने निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा: India US Trade Deal: कोर्टाच्या एका निर्णयाने बदलली व्यापाराची दिशा; प्रभावी अस्त्रामुळे व्यापारात भारत अमेरिकेच्या वरचढ?
अजितदादांच्या निधनामुळे होणारी ही पोटनिवडणूक राज्यात बिनविरोध व्हावी, यासाठी पक्षाकडून सर्वतोपरी राजकीय कौशल्य पणाला लावले जाणार आहे. त्यामुळे आता बारामतीची संपूर्ण धुरा सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर असणार असून, त्या थेट विधानसभेच्या आखाड्यातून जनतेचे प्रतिनिधित्व करताना दिसतील.
एकीकडे बारामती विधानसभेचे चित्र स्पष्ट होत असतानाच, दुसरीकडे राज्यसभेच्या राजकीय सारीपाटावरही राष्ट्रवादीने मोठी खेळी केली आहे. आगामी काळात होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी दिवंगत अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे नाव पक्षाचे उमेदवार म्हणून निश्चित झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी, खासदार सुनील तटकरे आणि इतर कोअर कमिटी सदस्यांच्या उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक पार पडली. विशेष म्हणजे, स्वतः सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार्थ पवार यांच्या नावावर अंतिम मोहोर उमटवण्यात आली आहे.
'वादळातही दीप तेवत ठेवायचा असतो,' या न्यायाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबीय आता नव्या उमेदीने सावरताना दिसत आहे. दिवंगत अजित पवारांसारख्या दिग्गज आणि तळागाळाशी नाळ जोडलेल्या नेत्याची उणीव भरून काढणे हे सोपे काम नाही. मात्र, सुनेत्रा पवार यांना विधानसभेत आणि पार्थ पवार यांना राज्यसभेच्या माध्यमातून राष्ट्रीय राजकारणात पाठवून पक्षाने एक भक्कम राजकीय संदेश दिला आहे. बारामतीचा बालेकिल्ला आणि पक्षाचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी आता ही नवी फळी सज्ज झाली असून, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता या आगामी आणि भावनिक पोटनिवडणुकीकडे लागले आहे.
हेही वाचा: Gold SIlver Rate Today: सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल; सराफ बाजारातील आजची स्थिती काय? जाणून घ्या आजचे ताजे दर