बीड : बीडच्या अंबाजोगाई शहरातील व्यापाऱ्याचे बंद घर फोडून तब्बल 53 तोळे सोने, पावणेदोन किलो चांदी आणि साडेपाच लाखांची रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या कारवाईत दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 27 तोळे सोने आणि 858 ग्रॅम चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीवर अगोदरचे 10 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल,अशी माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली.
50 सीसीटीव्ही फुटेजने फोडला गुन्हा
मिळालेल्या माहितीनुसार, आंबेजोगाई शहरात 20 सप्टेंबर रोजी व्यापारी सारडा यांच्या बंद घरात ही घरफोडी झाली होती. या प्रकरणाचा तपास करताना एलसीबीच्या पथकाने परिसरातील 50 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून तीन संशयित दुचाकीवरून जात असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी परळी परिसरात सापळा रचून अमर काकासाहेब थोरात आणि जगजितसिंग अचलसिंग दुधानी या दोघांना ताब्यात घेतलं.
तिसऱ्या आरोपीबाबत समोर आली धक्कादायक माहिती
चोरीनंतर आरोपींनी तलावाजवळ दागिन्यांची वाटणी केल्याचं तपासात समोर आलं. तसंच सीसीटीव्हीचा डीव्हीआर आणि इतर साहित्य तलावात फेकून दिलं होतं. पोलिसांनी तलावात शोध घेऊन डीव्हीआरही हस्तगत केला असून, त्यामुळे तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली. या प्रकरणातील मंगलसिंग बावरी हा तिसरा आरोपी फरार असून, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, चोरीची साडेपाच लाख रुपयांची रोकड अद्याप हस्तगत झालेली नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.द रम्यान,2026 या वर्षातील पोलिसांची ही सर्वात मोठी कामगिरी आहे.
‘या’ कारणाने रचला कट
आरोपी अमर थोरात हा रिक्षाचालक असून, त्यानेच सारडा यांचे बंद घर हेरले होते. त्याची पत्नी गर्भवती असून प्रसूतीसाठी पैशांची गरज असल्याने त्याने हा कट आखल्याचे समोर आले आहे. चोरीनंतर तिघांनी एका दर्यामागील तलावाजवळ जाऊन हातमोजे, जॅकेट, कपडे आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर पाण्यात फेकला. चोरीनंतर अंबाजोगाईतील तलावावर दागिन्यांची वाटणी केली.
हेही वाचा- Pune: विसर्जनाच्या गर्दीत मोबाईल चोरीचा धुमाकूळ; शिवाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
आरोपी जगजीतसिंग याच्यावर 10 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. जगजितसिंग आणि मंगलसिंग या दोघांवर दरोडा, चोरी तसेच घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. दुधानी हा सध्या परभणी आणि लातूर जिल्ह्यात एटीएम व इतर चोऱ्यांमध्ये फरार होता. तलावा काठीच तिघांनी साडेपाच लाख रुपयांची रोकड अन् दागिन्यांची तोंडून वाटणी केली होती. या टोळीवर हद्दपार, मकोका, मुंबई झोपडपट्टी दादा कायद्यानुसार कारवाई केली जाईल असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.