Friday, March 13, 2026 11:26:48 PM

Devendra Fadnavis: 'उद्योजकांना धमकावाल तर याद राखा...'; सुपा MIDC तून मुख्यमंत्र्यांचा इशारा

'औद्योगिक क्षेत्रातील झुंडशाही आणि खंडणीखोरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. अशा घटकांना कायद्याच्या बडग्याने ठोकून काढले जाईल,' अशा कडक शब्दांत त्यांनी इशारा दिला.

devendra fadnavis उद्योजकांना धमकावाल तर याद राखा सुपा midc तून मुख्यमंत्र्यांचा इशारा

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत अडथळा आणणाऱ्या आणि उद्योजकांना धमकावणाऱ्या प्रवृत्तींचा बिमोड करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. 'औद्योगिक क्षेत्रातील झुंडशाही आणि खंडणीखोरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. अशा घटकांना कायद्याच्या बडग्याने ठोकून काढले जाईल,' अशा कडक शब्दांत त्यांनी सुपा येथील कार्यक्रमात गुंडांना बजावले. अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा (ता. पारनेर) येथील एका खासगी औद्योगिक प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उद्योजकांचे संरक्षण हीच प्राथमिकता
पारनेरमध्ये नवीन औद्योगिक वसाहती निर्माण होत असताना काही समाजकंटक उद्योजकांना त्रास देत असल्याचे समोर आले आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले, "उद्योजकांना धमकावणे किंवा त्यांच्याकडे खंडणी मागण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. यापूर्वीही अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त केला आहे आणि यापुढेही कोणाची गय केली जाणार नाही."

पोलिस प्रशासनाला फ्री-हँड
औद्योगिक क्षेत्रातील छोट्या गुन्ह्यांकडेही दुर्लक्ष करू नका, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. "ठोकून काढू याचा अर्थ कायद्याच्या चौकटीत राहून केलेली सर्वात कठोर कारवाई," असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - Chhatrapati Sambhajinagar : 'हेच का तुमचं बेगडी हिंदुत्व?'; परीक्षेदरम्यान महिलांना मंगळसूत्र काढण्याच्या सक्तीवरून अंबादास दानवे आक्रमक

विजेचे दर स्थिर राहणार
दरम्यान, उद्योजकांना दिलासा देताना मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली. पुढील पाच वर्षे औद्योगिक विजेच्या दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही, उलट हे दर कमी कसे होतील यावर सरकार काम करत आहे. जर स्थानिकांना उद्योगांकडून काही त्रास असेल, तर त्यांनी स्वतः कायदा हातात न घेता नियामक यंत्रणेकडे दाद मागावी. मात्र, एमआयडीसीच्या नावाखाली होणारी दादागिरी मोडून काढली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. जोपर्यंत प्रामाणिक उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणूक करत आहेत, तोपर्यंत राज्याची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.  
 


सम्बन्धित सामग्री