Saturday, July 12, 2025 12:42:42 AM

'आम्ही मराठी माणसासाठी काम ... ; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर भरत गोगावले यांची जोरदार टीका

पंढरपूरमध्ये भरत गोगावले यांनी ठाकरे गटावर टीका करत शिंदे यांच्या नेतृत्वाचं समर्थन केलं. मराठी माणसासाठी शिंदे सरकार कार्यरत असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं.

आम्ही मराठी माणसासाठी काम   ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर भरत गोगावले यांची जोरदार टीका

पंढरपूर: राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या ‘ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या’ चर्चांवर रोजगार हमी योजनांचे मंत्री भरत गोगावले यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्ही मराठी माणसासाठी काम करत नाही का?' असा सवाल उपस्थित करत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक मुद्द्यांवरून निशाणा साधला.

पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरात दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना गोगावले यांनी शिवसेनेतील सध्याच्या घडामोडींबाबत सडेतोड भूमिका मांडली. रायगडच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी त्यांनी विठ्ठलाला साकडं घातल्याचंही यावेळी सांगितलं.

शिवसेनेत मोठ्या प्रमाणात होत असलेल्या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे हवालदिल झाले आहेत. त्यामुळेच त्यांच्या गटाकडून एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका केली जात असल्याचं गोगावले म्हणाले. 'जो कोणी एकनाथ शिंदेंविषयी वेडंवाकडं बोलतो, तो व्यक्ती त्याच्यापेक्षा मोठा मूर्ख कोणी असू शकत नाही. जर एक इंचही शिंदे यांनी बाळासाहेबांचं नाव कमी केलं असेल, तर आम्ही चार वेळा माफी मागतो,' असं स्पष्ट विधान करत त्यांनी ठाकरे गटाला थेट आव्हान दिलं.

'आज बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जर कोणी संघटना उंचीवर नेत असेल, तर ते एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची वाटचाल होत आहे,' असंही गोगावले म्हणाले.

ठाकरे बंधू (उद्धव व राज ठाकरे) एकत्र येणार असल्याच्या चर्चांवरही त्यांनी उपरोधिक टीका केली. 'आम्ही जे काम करतोय ते मराठी माणसासाठी नाही का? हिंदुत्वासाठी नाही का? आम्ही काय मराठी माणसाला उत्तर प्रदेशात किंवा पाकिस्तानात घालवतोय?' असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले.

बाळासाहेबांच्या विचारांप्रमाणेच आपण मराठी माणसाच्या हितासाठी झटतो आहोत, हे त्यांनी ठामपणे सांगितलं. राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत असून, त्या सरकारच्या माध्यमातून मराठी जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत, हेही त्यांनी अधोरेखित केलं.

या सर्व विधानांमुळे ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आगामी काळात या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार मिळण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री