Friday, March 13, 2026 08:14:09 AM

Pune Crime News: आई-भावाच्या डोळ्यांत चटणी फेकली आणि भर बाजारात तरुणीचे अपहरण; संतप्त ग्रामस्थांचा जनआक्रोश मोर्चा

पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे 21 वर्षीय तरुणीच्या अपहरणानंतर संतप्त नागरिकांनी महामार्गावर जाळपोळ करत रास्ता रोको केला. आज भिगवण बंदची हाक देण्यात आली असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

pune crime news आई-भावाच्या डोळ्यांत चटणी फेकली आणि भर बाजारात तरुणीचे अपहरण संतप्त ग्रामस्थांचा जनआक्रोश मोर्चा

Pune Crime News: पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भर बाजारपेठेत आई आणि भावासमोर 21 वर्षीय तरुणीचे अपहरण करण्यात आल्याच्या घटनेने नागरिक संतप्त झाले असून या प्रकरणाचे पडसाद थेट पुणे-सोलापूर महामार्गावर उमटले.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी काही दिवसांत विवाहबंधनात अडकणार होती. खरेदीसाठी ती मंगळवारी दुपारच्या सुमारास आई आणि भावासोबत भिगवण बाजारपेठेत आली होती. याच वेळी काही संशयितांनी त्यांच्या वाहनाला अडवून गोंधळ घातला. तरुणीच्या आई व भावाच्या डोळ्यांत तिखट पदार्थ फेकून त्यांच्यावर मारहाण करण्यात आली आणि त्या गोंधळाचा फायदा घेत तरुणीला जबरदस्तीने घेऊन जाण्यात आले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी तत्काळ भिगवण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही चित्रफितींची तपासणीही सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

हेही वाचा: Satara Karad Crime : कराडमध्ये धक्कादायक प्रकार! 45 वर्षीय प्रियकरावर कुऱ्हाडीने वार; स्वत: महिलेनंच दिली पोलिसांना खबर

दरम्यान, या घटनेनंतर भिगवणमध्ये संतापाची लाट उसळली. ग्रामस्थांनी आणि काही संघटनांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर काही संतप्त नागरिकांनी पुणे-सोलापूर महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको केला. काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणामुळे भिगवण शहरात कडकडीत बंदची हाक देण्यात आली आहे. बहुतांश व्यापाऱ्यांनी या बंदला प्रतिसाद दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्याची घोषणाही करण्यात आली आहे. या मोर्चात विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा: फिल्मी स्टाईलने अपहरण; राजस्थान पार्सलचा बनाव फसला, 3 तासांत आरोपी गजाआड, नेमकं काय घडलं?

सध्या संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासन सतर्क आहे. अपहरण झालेल्या तरुणीचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.

या घटनेने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भर बाजारपेठेत अशी घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, तरुणी सुरक्षित परत यावी आणि आरोपींना शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.


सम्बन्धित सामग्री