पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. चार वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 65 वर्षीय संशयित आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बालिका बेपत्ता झाल्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. ही माहिती समोर येताच संपूर्ण नसरापूर परिसरात शोककळा पसरली आणि संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. पुणे-सातारा महामार्गावर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करत रास्ता रोको केला. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. संशयित आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले आणि चौकशीनंतर अटक करण्यात आली. मात्र, या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आरोपीला जनतेच्या हवाली करण्याची मागणी केली. परिसरात तणाव निर्माण झाल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.या अमानुष घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी ही घटना अत्यंत निंदनीय, वेदनादायक आणि संतापजनक असल्याचे म्हटले. पीडित कुटुंबाच्या दुःखात संपूर्ण राज्य सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले, आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या भूतकाळातील काही गंभीर संदर्भही समोर येत आहेत. समाजात या घटनेविरोधात मोठा रोष आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल. आवश्यक असल्यास विशेष फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे विनंती करण्यात येईल. तसेच विशेष सरकारी वकील नेमून आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी सरकार प्रयत्न करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.