शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत राजकीय हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कॉक्रोज जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांचे देशव्यापी आंदोलन सुरु असताना शरद पवार यांनी दिल्लीच्या संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तर शरद पवार यांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे यांनी देखील अमित शहा यांची पूर्व नियोजित भेट घेतली.
यादरम्यान दिल्लीत एक महत्त्वाची घडामोड घडल्याची माहिती समोर आली आहे. प्रफुल पटेल आणि पार्थ पवार यांनी गेल्या आठवड्यात शरद पवार यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली असून या भेटीत तिन्ही नेत्यांची राजकीय चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार अशा चर्चांना उधाण आलं आहे.
एकीकडे मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पवार पक्ष एनडीएसोबत जाण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे, तर दुसरीकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन होऊनच एनडीएमध्ये येण्याची अट घातल्याचेही समोर आले आहे. तर या भेटीत मतदार संघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयक या विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत तिन्ही नेत्यांची चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीएला बाहेरून पाठिंबा देणार? याबाबत प्राथमिक चर्चा करत शरद पवार यांनी पक्षाची भूमिका प्रफुल पटेल आणि पार्थ पवार यांच्या समोर मांडली. दरम्यान पार्थ पवार व प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे येत्या काळात शरद पवार यांची राष्ट्रवादी मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.