Rajya Sabha election: मुंबईत राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रिक्त जागांसाठी पक्षांतर्गत हालचाली सुरू असून उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी पार पडत आहे. या बैठकीत पक्षाकडून राज्यसभेसाठी चार उमेदवार उभे करण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
भाजपच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी एका जागेसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे नाव आघाडीवर असल्याचे म्हटले जात आहे. ते 2016 पासून राज्यसभेत प्रतिनिधित्व करत असून त्यांचा कार्यकाळ एप्रिल 2026 मध्ये संपत आहे. त्यामुळे एनडीएच्या पाठिंब्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता बळावली आहे. उर्वरित तीन जागांसाठी संभाव्य नावांवर मंथन सुरू असून अंतिम निर्णय कोअर कमिटीच्या चर्चेनंतर होणार आहे.
हेही वाचा: Ambadas Danve : संदिपान भुमरेंचा ड्रायव्हर 1150 कोटींचा मालक?; अंबादास दानवेंनी पुराव्यांसह उघड केला महाघोटाळा
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे तसेच आमदार सुनील मुनगंटीवार यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. उमेदवार निवडीत सामाजिक समतोल, राजकीय गणित आणि आगामी निवडणुकांचा विचार केला जात असल्याचे समजते.
राज्यसभेच्या सात जागांपैकी चार जागांवर भाजप विजय मिळवू शकते, अशी संख्याबळाची स्थिती आहे. उर्वरित जागांवर सहयोगी पक्षांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर विरोधकांकडे मर्यादित संख्याबळ असल्याने त्यांना एका जागेसाठीच अनुकूल स्थिती असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
हेही वाचा: Ajit Pawar Plane Crash Update: दादांच्या निधनानंतर मोठा निर्णय! संबंधित विमान कंपनीवर सरकारची थेट कारवाई; आदेश देत म्हटलं की...
2022 मधील राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये वापरलेला रणनीतीचा फॉर्म्युला यंदाही वापरला जाऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे. त्यावेळी अपेक्षेपेक्षा अधिक जागा जिंकत भाजपने राजकीय गणित बदलले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही अतिरिक्त जागेसाठी प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आता कोअर कमिटीच्या बैठकीनंतर अधिकृत घोषणा कधी होते आणि अंतिम यादीत कोणकोणाची नावे येतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राज्यसभा निवडणूक ही केवळ संसदीय प्रक्रिया नसून आगामी राजकीय समीकरणांची दिशा ठरवणारी ठरू शकते, असे चित्र सध्या दिसत आहे.