Rajesh Wankhede MSEDCL Warning: वाठोडा शुक्लेश्वर परिसरातील शेतकऱ्यांच्या वीज पुरवठ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. पिकांना वेळेवर आणि पुरेसा वीज पुरवठा मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन भाजप आमदार राजेश वानखेडे थेट महावितरणच्या कार्यालयात पोहोचले. महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकरी हैराण झाले असून, यापुढे शेतकऱ्यांना विनाकारण त्रास दिल्यास अधिकाऱ्यांना थेट खांबाला बांधून ठेवू, असा आक्रमक आणि थेट इशाराच आमदार राजेश वानखेडे यांनी महावितरण प्रशासनाला दिला आहे.
कापूस पिकाचे नुकसान टाळण्यासाठी 9 – 9 तासांच्या विजेचे नियोजन
महावितरणच्या विविध तांत्रिक समस्यांमुळे शेतकऱ्यांचे कपाशीसारखे नगदी पीक वाया जाण्याच्या मार्गावर आहे. हे पीक वाचवण्यासाठी आणि पिकांना योग्य प्रमाणात पाणी देता यावे यासाठी आमदार वानखेडे यांनी कार्यकारी अभियंत्यांसोबत बैठक घेतली. महावितरणने ओव्हरलोड आणि इतर अडचणींवर मार्ग काढत दिवसा 9 तास आणि रात्री 9 तास अशा दोन टप्प्यांत योग्य नियोजन करून वीज पुरवठा करण्याचे मान्य केले आहे. यामुळे संकटात सापडलेल्या स्थानिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लोकप्रतिनिधींचे ठिय्या आंदोलन आणि इशारा
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान रोखणे आणि त्यांना हक्काची वीज मिळवून देणे हाच या आंदोलनामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले. महावितरणने दिलेल्या आश्वासनानुसार वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. लोकप्रतिनिधींच्या या आक्रमक भूमिकेमुळे महावितरण प्रशासनाची चांगलीच पळापळ झाली असून, परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.