नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्ष संघटनेतील कार्यपद्धतीवर थेट भाष्य करत, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचे लक्ष वेधले आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्यांनी केलेले विधान राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला उधाण आणत आहे.
गेल्या काही काळात भाजपमध्ये इतर पक्षांतून मोठ्या प्रमाणात नेते व कार्यकर्त्यांचे आगमन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा अतिशय स्पष्टपणे मांडला. नागपुरी शैलीत बोचरी उपमा देत त्यांनी म्हटले, “जुना कार्यकर्ता हा घरकी मुर्गी दाल बराबर आहे "
गडकरी यांनी कळमेश्वर-सावनेर भागातील पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या डॉ. राजीव पोतदार यांचा उल्लेख करत, मंचावर उपस्थित असलेल्या महाराष्ट्र भाजपचे ज्येष्ठ नेते व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे थेट लक्ष वेधले. “डॉ. पोतदारसारखा प्रामाणिक कार्यकर्ता आहे, पण बावनकुळे त्याकडे लक्ष देत नाहीत… जुन्या लोकांकडे लक्ष द्या… हे माझ्या काळातले कार्यकर्ते आहेत,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
हेही वाचा: Satara Doctor Case : फलटण डॉक्टर अत्याचारप्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला बेड्या ठोकल्या
पुढे बोलताना त्यांनी पक्षसमृद्धीचा वेग टिकवण्यासाठी जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांचे महत्त्व अधोरेखित केले. “प्रामाणिक कार्यकर्त्यांची कदर नाही केली, तर पक्ष जसा जलद वाढतोय, तितक्याच वेगाने खालीही येऊ शकतो. जुन्या कार्यकर्त्यांची आठवण ठेवा,” असा कडक इशारा गडकरींनी दिला.
त्यांच्या या वक्तव्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, भाजपच्या संघटनात चालू असलेल्या ‘इन्कमिंग’ राजकारणावरही गडकरी यांचे हे विधान राजकीय संदेश म्हणून पाहिले जात आहे.
हेही वाचा: AI Monsoon Prediction: AI द्वारे भारताने मान्सून अंदाजात रचला ऐतिहासिक विक्रम; तब्बल एवढ्या लाख शेतकऱ्यांना झाला हा फायदा...