मुंबई: येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) रणधुमाळीने संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात आयोजित एका विशेष मुलाखतीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंची युती, अजित पवारांची टीका आणि कौटुंबिक राजकारणावर मनमोकळेपणाने भाष्य केले. अभिनेत्री गिरिजा ओक हिने घेतलेल्या या मुलाखतीत फडणवीस यांनी आपल्या मिश्किल आणि तितक्याच धारदार शैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
'माझ्यामुळे कुटुंब जवळ येत असतील तर आनंदच!'
मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू अनेक वर्षांनंतर राजकीयदृष्ट्या एकत्र आले आहेत. राज ठाकरेंनी या युतीचे श्रेय मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले होते. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते की या दोन्ही भावांनी एकत्र यावे. जर माझ्यामुळे हे स्वप्न पूर्ण होत असेल आणि दोन भाऊ जवळ येत असतील, तर मला त्याचे समाधानच आहे. राज ठाकरेंनी मला क्रेडिट दिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. चांगले काम केल्याचे आशीर्वादच मला मिळतील."
पुण्यात भाऊ-बहिणीच्या जोडीवर मिश्किल टोलेबाजी
मुंबईत भाऊ-भाऊ एकत्र आले असताना पुण्यात अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे भाऊ-बहीण सोबत येवून लढत आहेत. यावर फडणवीसांना प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्किलपणे उत्तर दिले. "माझ्यामुळे ठाकरे बंधू जवळ आले हे ठीक आहे, पण आता अजितदादा आणि सुप्रियाताई माझ्यामुळे एकत्र आले आहेत का? आणि तसे झाले असेल तर ते मला धन्यवाद देतील का? याची मला कल्पना नाही," असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. सध्या पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येत निवडणूक लढवत असताना फडणवीसांची ही टिप्पणी विशेष चर्चेत राहिली आहे.
अजितदादांचा संयम का ढळला? फडणवीसांचे स्पष्टीकरण
निवडणुकीच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केलेल्या टीकेबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, "पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आम्ही युतीने लढू शकत नाही हे आम्हाला आधीच उमजले होते. कारण येथे दोन्ही पक्ष सक्षम आहेत. आम्ही ठरवले होते की ही 'मैत्रीपूर्ण लढत' असेल आणि एकमेकांवर वैयक्तिक टीका टाळली जाईल. मी अजूनही संयम पाळला आहे, मात्र सध्याची निवडणूक परिस्थिती पाहून दादांचा संयम थोडा ढळलेला दिसतोय. पण काळजी नसावी, 15 तारखेनंतर ते पुन्हा शांत होतील."
निवडणुकीच्या या रणधुमाळीत फडणवीसांनी वापरलेली 'मिश्किल शैली' आणि अजितदादांच्या संयमावर केलेले भाष्य सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ठाकरे बंधूंच्या युतीचे क्रेडिट स्वीकारून त्यांनी एकीकडे माणुसकी जपल्याचे दाखवले असले, तरी दुसरीकडे '15 तारखेनंतर दादा बोलणार नाहीत' असे म्हणून त्यांनी राजकीय तणाव कायम ठेवला आहे. आता फडणवीसांचा हा विश्वास सार्थ ठरणार की निवडणुकीचे निकाल काही वेगळाच धक्का देणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे