मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचा (BMC Election 2026) रणसंग्राम आता रंगात आला असून, ‘मुंबईचा महापौर कोण?’ या प्रश्नावरून राजकीय आखाडा तापला आहे. भाजपचे रोखठोक नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी या वादात उडी घेत शिवसेना ठाकरे गट आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. “मुंबईचा महापौर हा केवळ मराठी आणि हिंदूच होणार,” अशी ठाम गर्जना करत राणेंनी ठाकरे गटाच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर बोचरी टीका केली आहे. यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत.
नितेश राणे यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एमआयएम (MIM) नेते वारिस पठाण यांच्या जुन्या विधानाचा संदर्भ देत त्यांनी ठाकरे गटाला आरसा दाखवला. पठाण यांच्या विधानावर आक्षेप न घेणाऱ्यांनी भाजपच्या विधानावर बोंब ठोकू नये, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. पुढे ट्विट करत त्यांनी लिहले आहे की, नितेश राणे म्हणाले की, “हिंदू आणि मराठी लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी ठाकरे गटाने जणू सुपारीच घेतली आहे.”
जितकी मिर्ची ठाकरे गटाला.. उत्तर भारतीय महापौर ची लागली..
तितकी मिर्ची बुरखे वाली महापौर बनेल ची का लागली नाही ?
यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतलेली दिसते..
बाकी..
मुंबई चा महापौर हा..
मराठी आणि हिंदूच होणार.
आणि तो आमचाच होणार ! मुंबई ❤️ महादेव ? — Nitesh Rane (@NiteshNRane) January 1, 2026
महापौर पदाच्या या वादाची सुरुवात भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्या विधानाने झाली होती. सिंह यांनी एका कार्यक्रमात “मुंबईचा महापौर उत्तर भारतीय असावा,” असे विधान केले होते, ज्याचे उत्तर भारतीयांच्या मुंबईतील योगदानाच्या संदर्भात त्यांनी समर्थन केले. मात्र, या विधानानंतर ठाकरे गट कमालीचा आक्रमक झाला आणि त्यांनी भाजपवर ‘मराठी अस्मिता’ पुसण्याचा आरोप केला.
नितेश राणे यांनी मुंबईची अस्मिता आणि हिंदुत्वाचे समीकरण मांडताना ‘मुंबई लव्ह महादेव’ आणि ‘हर हर महादेव’ असा नारा दिला. राणेंच्या या भूमिकेमुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता केवळ विकासकामांवरून नव्हे, तर प्रखर हिंदुत्व आणि भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावर लढली जाण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ‘मराठी विरुद्ध अमराठी’ हा वाद जुनाच आहे, मात्र यावेळी नितेश राणेंनी त्यात ‘हिंदू’ कार्ड खेळून विरोधकांची कोंडी केली आहे. 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानाआधी अशा प्रकारच्या शाब्दिक चकमकींमुळे मतदारांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. कृपाशंकर सिंहांच्या विधानावरून सुरू झालेला हा वाद आता थेट ‘बुरखा विरुद्ध हिंदुत्व’ असा वळण घेताना दिसत असून, या संघर्षात कोण बाजी मारते हे पाहणे रंजक ठरेल.