मुंबई: अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई सुरूच आहे. आता मुंबईतील प्रसिद्ध द बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब लिमिटेडवर FDAने मोठी कारवाई केली आहे. किचनमध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्यानंतर क्लबचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.
19 ऑगस्ट रोजी FDAच्या विशेष पथकाने रेडिओ क्लबच्या किचनची अचानक तपासणी केली. यावेळी स्वच्छतेसह अन्नपदार्थांच्या साठवणुकीबाबत अनेक धक्कादायक त्रुटी आढळून आल्या. किचनच्या विविध भागांमध्ये माशांचा मोठ्या प्रमाणावर वावर असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. काही ठिकाणी मृत झुरळेही आढळली. भांडी धुण्याच्या परिसरात उघडे कॉकरोच ट्रॅप ठेवण्यात आल्याचेही तपासणीत समोर आले.
अन्न तयार करण्याच्या जागेच्या छताचे प्लास्टर खराब झाले होते. त्यामुळे त्याचे तुकडे खाद्यपदार्थांमध्ये पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. विशेष म्हणजे, अन्नपदार्थ ठेवण्यात येणाऱ्या भागाजवळच वॉशिंग पावडर आणि इतर रसायने साठवण्यात आली होती. कच्चा खाद्यमाल तसेच भांडी जमिनीवर ठेवलेली आढळली.
क्लबच्या नॉन-व्हेज खाद्यपदार्थांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेफ्रिजरेटरचीही स्वच्छता समाधानकारक नसल्याचे तपासणीत आढळले. मांसाहारी पदार्थ योग्य पद्धतीने डीफ्रॉस्ट केले जात नसल्याचेही समोर आले.
फक्त किचनची परिस्थितीच नव्हे, तर कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेबाबतही गंभीर त्रुटी आढळल्या. कर्मचाऱ्यांचे वापरलेले कपडे आणि घामाने भिजलेल्या कॅप्स खाद्यपदार्थांच्या जवळ ठेवण्यात आल्या होत्या. किचनचे प्रवेशद्वार व्यवस्थित बंदिस्त नसल्याचेही आढळले. स्वयंपाकाच्या स्टोव्हच्या शेजारी उघडे कचरापेटी ठेवण्यात आली होती. क्लब परिसरात ठिकठिकाणी थुंकल्याच्या खुणाही अधिकाऱ्यांना दिसून आल्या.
47 टक्के नियमांचे उल्लंघन
FDAच्या तपासणीत रेडिओ क्लबकडून तब्बल 47 टक्के अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर असल्याने अन्नसुरक्षा आणि मानके कायदा 2006 मधील कलम 32(3) आणि संबंधित नियमांनुसार क्लबचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे.
लायसन्स निलंबित असेपर्यंत क्लबला खाद्यपदार्थ खरेदी करणे, तयार करणे, विकणे किंवा वितरित करण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास पुढील कठोर कायदेशीर कारवाईचा इशाराही FDA प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, ऑटर्स क्लबनंतर आता रेडिओ क्लबवर झालेल्या कारवाईमुळे मुंबईतील क्लब आणि खाद्य व्यवसायांमध्ये खळबळ उडाली आहे. FDAच्या पुढील तपासण्या आणि कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.