Satish Bhosale Bail: भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय सतीश भोसले उर्फ ‘खोक्या’ हा त्याच्या लॅविश लाईफस्टाईल नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे. विविध गंभीर गुन्ह्यांखाली मागील एक वर्षापासून कारागृहात असलेल्या खोक्याला अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्याच्या या सुटकेमुळे बीड जिल्ह्याच्या राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले असून, प्रशासनासमोर कायदा-सुव्यवस्था राखण्याचे नवे आव्हान उभे ठाकले आहे.
अमानुष मारहाण आणि अटकेची पार्श्वभूमी
सतीश भोसलेच्या अटकेमागे बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ या तरुणाला झालेली अमानुष मारहाण हे मुख्य कारण होते. क्रिकेटच्या बॅटने केलेल्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला होता, ज्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. या व्यतिरिक्त शिरूर तालुक्यातील ढाकणे पिता-पुत्राला मारहाण केल्याचाही त्याच्यावर आरोप होता. यापैकी एका प्रकरणात त्याची निर्दोष मुक्तता झाली असून, बॅट मारहाण प्रकरणात त्याला जामीन मिळाला आहे.
‘ग्लास हाऊस’वर हातोडा
‘खोक्या’ हा त्याच्या गुन्हेगारी कारवायांपेक्षा जास्त त्याच्या ‘शो-ऑफ’मुळे चर्चेत असायचा. गाडीच्या डॅशबोर्डवर पैशांची बंडले ठेवणे, हेलिकॉप्टरमधून दिमाखात एन्ट्री घेणे आणि पंचतारांकित हॉटेल्समधील विलासी जीवनाचे रिल्स बनवणे ही त्याची ओळख बनली होती. मात्र, तो कारागृहात असताना प्रशासनाने त्याच्यावर कडक कारवाई केली होती. वनविभागाच्या जागेत असलेले त्याचे आलिशान ‘ग्लास हाऊस’ जमीनदोस्त करण्यात आले होते.
वन्यप्राण्यांची शिकार आणि इतर गुन्हे
शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी असलेला सतीश भोसले गेल्या पाच वर्षांपासून राजकारणात सक्रिय होता. केवळ मारहाणच नाही, तर त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गतही गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या घरात वन्य प्राण्यांची शिकार करून ठेवलेले हरणाचे मांस आढळल्याने खळबळ उडाली होती. अशा प्रकारच्या अघोरी कृत्यांमुळे त्याची प्रतिमा एक ‘उपद्रवी’ व्यक्ती म्हणून तयार झाली होती.