बीड : केज तालुक्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची 16 महिन्यांपूर्वी वाल्मिक कराडच्या टोळीने निर्घृण हत्या केली होती. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी भाऊ धनंजय देशमुख लढा देत आहेत. दरम्यान त्यांनी भाऊ संतोष देशमुखांचा फोटो टॅटूच्या माध्यमातून मानेवर कोरला आहे. त्यासोबतच सत्य-विरा-युद्ध असेही नावं कोरले आहे. जी त्यांच्या मुलांची नावं आहेत. टॅटू काढलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन येत आहेत.
संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी दिवसाढवळ्या डोंगाव टोल प्लाझाजवळ एका काळ्या स्कॉर्पिओ एसयूव्हीमधील सहा जणांनी अपहरण केले. त्यांना ठार मारण्यापूर्वी जवळपास तीन तास त्यांचा छळ करण्यात आला; त्यांचा मृतदेह नंतर दैठाणा शिवारजवळ रस्त्याच्या कडेला सापडला. शवविच्छेदन अहवालानुसार, देशमुख यांच्या शरीरावर 41 इंचाचा गॅस सिलेंडर पाईप, लोखंडी सळ्या, लाकडी काठ्या आणि नकेल डस्टर्स यांसारख्या बोथट आणि धारदार वस्तूंनी केलेल्या 56 जखमा होत्या. अनेक जखमांमुळे झालेला रक्तस्राव आणि धक्का हे त्यांच्या मृत्यूचे कारण असल्याचे निश्चित करण्यात आले. त्यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह 6 जणांना अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा खटला कोर्टात सुरू आहे.