Nashik Mayor : नाशिक महानगरपालिकेच्या (NMC) सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटला असून, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती सत्तेत आली आहे. शुक्रवारी पार पडलेल्या निवड प्रक्रियेत भाजपच्या हिमगौरी आडके यांची महापौरपदी, तर शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांची उपमहापौरपदी अधिकृत निवड करण्यात आली. निवडणुकीत एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकणारे हे दोन्ही पक्ष आता 'विकास' या एकाच मुद्द्यावर नाशिकच्या सत्तेत एकत्र आले आहेत.
'ही जबाबदारी म्हणजे महिला शक्तीचा सन्मान'
महापौरपदी निवड झाल्यानंतर जय महाराष्ट्रच्या प्रतिनिधीशी बोलताना नवनियुक्त महापौर हिमगौरी आडके यांनी या पदाला 'सेवेची संधी' असे संबोधले. त्या म्हणाल्या, "हा केवळ माझा विजय नाही, तर संपूर्ण महिला शक्तीचा आणि महायुतीचा विजय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 'संकटमोचक' गिरीश महाजन यांनी दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेन. संघर्ष जितका मोठा असतो, विजय तितकाच भव्य असतो, याची प्रचिती आज आली आहे."
पहिले 100 दिवस: 'प्रभाग न्याय' विकासाचा प्लॅन
नाशिकच्या विकासासाठी त्यांनी एक कृती आराखडा जाहीर केला आहे. येत्या पहिल्या 100 दिवसांत संपूर्ण नाशिकचा दौरा करून प्रत्येक प्रभागाच्या गरजा समजून घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. "नाशिक ही जशी रामभूमी आहे, तशीच ती आता 'कामभूमी' देखील होईल. प्रत्येक प्रभागातील स्थानिक आमदारांना आणि नगरसेवकांना सोबत घेऊन विकासाचा आराखडा तयार केला जाईल आणि तो मंजुरीसाठी मुख्यमंत्री व गिरीश महाजन यांच्याकडे सादर केला जाईल," असे आडके यांनी नमूद केले.
हेही वाचा - Ahilyanagar Mayor : अहिल्यानगरच्या महापौरपदी ज्योती गाडे तर उपमहापौरपदी धनंजय जाधव यांची बिनविरोध निवड
कुंभमेळा आणि धर्मजागराचे आव्हान
नाशिकमध्ये आगामी काळात होणाऱ्या कुंभमेळ्याला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी आणि शहराच्या सुशोभीकरणासाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे. नाशिकच्या निसर्गरम्य वातावरणाला धक्का न लावता आधुनिक विकासाची कास धरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या सोबतीने नवी ऊर्जा
शिवसेना शिंदे गट सोबत आल्याने महायुतीची ताकद वाढली असल्याचे सांगत त्या म्हणाल्या, "निवडणूक संपल्यानंतर आम्ही पक्षाच्या पलीकडे जाऊन शहराचा विचार करतो. सभागृहात गेल्यानंतर 122 ही नगरसेवकांची मानसिकता केवळ नाशिकचा विकास हीच असली पाहिजे. विलास शिंदे यांच्या रूपाने आम्हाला अनुभवी सोबती मिळाले असून, एकत्रितपणे आम्ही नाशिकची प्रगती करू." असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.