मध्य रेल्वेच्या एसी लोकलमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. टिटवाळा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)कडे निघालेल्या एसी लोकलमधील एका एसी युनिटमध्ये बिघाड झाल्याने डब्यातील वातानुकूलित व्यवस्था बंद पडली. दरवाजे आणि खिडक्या बंद असल्यामुळे अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास झाला, तर काही महिला प्रवासी बेशुद्ध पडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही एसी लोकल नियमित सेवेनुसार टिटवाळा येथून सीएसएमटीकडे जात होती. मात्र, प्रवासादरम्यान एका एसी युनिटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने डब्यातील हवा खेळती राहिली नाही. परिणामी, उकाडा वाढल्याने अनेक प्रवाशांना गुदमरल्यासारखे वाटू लागले.
मुलुंड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर लोकल थांबलेली असताना जवळपास १५ मिनिटे एसी बंद असल्याचा प्रवाशांचा दावा आहे. या काळात काही प्रवाशांना श्वास घेण्यास अडचणी निर्माण झाल्या. विशेषतः काही महिला प्रवासी बेशुद्ध पडल्याने स्थानकावरील इतर प्रवाशांनी त्यांना तातडीने मदत केली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने संबंधित लोकल कुर्ला स्थानकात सेवेतून बाजूला काढली. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवून पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली. बिघाड झालेली एसी लोकल दुरुस्तीसाठी कार्यशाळेत पाठवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
या घटनेचा परिणाम पुढील दोन फेऱ्यांवरही झाला असून संबंधित एसी लोकलच्या दोन सेवा तात्पुरत्या नॉन-एसी लोकल म्हणून चालवण्यात येणार आहेत. तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण शोधण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तपास सुरू आहे.
दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी एसी लोकलची नियमित तांत्रिक तपासणी आणि देखभाल अधिक प्रभावीपणे करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.