सणासुदीच्या दिवसात रेल्वे स्थानकांवर होत असलेली प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. दसरा, दिवाळी आणि छठ पूजे निमित्ताने मुंबई ते बेंगळुरु या दरम्यान मिरज मार्गे विशेष साप्ताहिक रेल्वे चालवली जाणार आहे. या विशेष गाडीच्या तब्बल 14 फेऱ्या होणार असून, यामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे सातारा, कराड, सांगली तसेच मिरज या परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
जाणून घ्या वेळापत्रक
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात CSMT ते बेंगळुरु गाडी क्रमांक 01013 ही एक्स्प्रेस 10 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीमध्ये दर शनिवारी मध्यरात्री 12 वाजून 35 मिनिटांनी मुंबईहून रवाना होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी बेंगळुरुला पोहोचेल.
तर दुसरीकडे,परतीच्या दिशेने बेंगळुरु ते CMST गाडी क्रमांक 01014 ही एक्स्प्रेस गाडी 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर दरम्यान दर रविवारी पहाटे 4 वाजून 30 मिनिटांनी सुटेल आणि सोमवारी पहाटे 4 वाजून 5 मिनिटांनी मुंबई दाखल होईल, अशी माहिती समोर येत असून दोन्ही बाजूने या एक्सप्रेसच्या प्रत्येकी 7 फेऱ्या होतील.
असे असतील थांबे
या एक्स्प्रेसला दादर, ठाणे, कल्याण,लोणावळा, पुणे, लोणंद, सातारा, कराड,सांगली, मिरज, कुडची, रायबाग, घटप्रभा, बेळगावी, लोंडा, धारवाड, हुबळी,हावेरी, दावणगेरे,तुमकुरु असे महत्त्वाचे थांबे देण्यात आलेला आहेत. विशेष म्हणजे, ही संपूर्ण गाडी असून यात एकूण 20 डबे असतील, त्यामुळे प्रवाशांचा सणाच्या दिवसातील प्रवास आरामदायी होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.