मुंबई : विना तिकीट प्रवासावर लगाम घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. एप्रिल 2026 महिन्यात तिकीट तपासणीद्वारे तब्बल 16 कोटी 13 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, हा आतापर्यंतचा सर्वोच्च आकडा ठरला आहे. यापूर्वी मे 2023 मध्ये 14 कोटी 50 लाख रुपयांची वसुली झाली होती. मात्र यंदा त्या विक्रमालाही मागे टाकत मध्य रेल्वेने नवा इतिहास घडवला आहे.
मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम राबवली. मेल-एक्सप्रेस गाड्यांपासून ते उपनगरी लोकल आणि एसी लोकलपर्यंत सर्वत्र ही मोहीम जोरात पार पडली. या कालावधीत एकूण 2 लाख 27 हजार अनियमित प्रवासाची प्रकरणे उघडकीस आली. या प्रकरणांमधूनच मोठ्या प्रमाणात दंड वसुली करण्यात आली.
विशेषतः एसी लोकलमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत 12 हजार 698 प्रकरणे नोंदवली गेली असून, त्यातून 39 लाख 66 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एसी लोकलमध्ये नियम मोडणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
सेकंड क्लास डब्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर विना तिकीट प्रवासी आढळले. तपासणीदरम्यान 1 लाख 58 हजार प्रवासी नियमभंग करताना पकडले गेले. या प्रकरणांतून तब्बल 13 कोटी 6 लाख रुपयांची वसुली झाली. यावरून उपनगरी रेल्वे प्रवासात अजूनही अनेक प्रवासी नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येते.
रेल्वे प्रशासनाने या मोहिमेमुळे प्रवाशांमध्ये शिस्त वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच, आगामी काळातही अशाच प्रकारच्या मोहिमा अधिक तीव्रतेने राबवण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.
मध्य रेल्वेच्या या कारवाईमुळे एप्रिल महिन्यात महसुलात मोठी वाढ झाली असून, विना तिकीट प्रवास करणाऱ्यांसाठी हा एक इशाराच मानला जात आहे. नियमित तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा केले आहे.