Chhagan Bhujbal Surgery: राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून 28 ऑक्टोबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला ते नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
शस्त्रक्रियेनंतर भुजबळ यांच्या प्रकृतीबाबत विविध चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगांवकर यांनी आज रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचा एक फोटो नांदगांवकर यांनी आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केला आहे. या छायाचित्रात भुजबळ रुग्णालयाच्या खाटेवर दिसत असून त्यांच्या हातात सलाईन लावलेली आहे. नांदगांवकर त्यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत.
भेटीनंतर बाळा नांदगांवकर यांनी भुजबळ यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली. तसेच ‘आमच्यात राजकीय मतभेद असू शकतात, पण मनभेद नाहीत,’ असे स्पष्ट मत त्यांनी सोशल मीडियावर मांडले. या भेटीबाबत भावना व्यक्त करताना नांदगांवकर म्हणाले की, छगन भुजबळ हे शिवसेनेत काम करत असताना त्यांचे ज्येष्ठ नेते होते. ठाकरे परिवार हा दोघांमधील समान दुवा असल्याचे त्यांनी नमूद केले. ठाकरे बंधू एकत्र आल्याबद्दल भुजबळ यांनीही मनापासून आनंद व्यक्त केला, असे त्यांनी सांगितले.
राजकीय वाटा वेगळ्या झाल्या असल्या तरी भुजबळ यांच्याबद्दल मनात कायम आदर असल्याचे नांदगांवकर यांनी नमूद केले. वयाच्या या टप्प्यावरही त्यांचा लढवय्या स्वभाव कायम असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयात असूनही भुजबळ जुन्या आठवणी, संघर्षाचे दिवस, मिळवलेले यश आणि बदललेले राजकारण याबद्दल उत्साहाने बोलत होते. या संवादादरम्यान दोघेही भावूक झाल्याचे नांदगांवकर यांनी सांगितले. तथापी, राज्यातील राजकीय संस्कृतीवर भाष्य करताना नांदगांवकर म्हणाले की, महाराष्ट्रात राजकीय विरोधक असतात, पण शत्रू नसतात. मतभेद असले तरी मनभेद नसावेत, ही परंपरा हळूहळू लुप्त होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राजकारणातील ‘धडधडती तोफ’ म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ लवकरात लवकर पूर्णपणे बरे होऊन पुन्हा सक्रिय होतील, अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.