विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: गोड रसरशीत जांभळांनी लगडणारी हिरवीगार झाडं, एकेका झाडाला लागलेली जवळपास क्विंटलभर जांभळं, जांभळं गोळा करण्यासाठीची लगबग आणि जांभळांनी भरलेले कॅरेट. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडमधील अशोक आणि रंजना डोईफोडे या शेतकरी दाम्पत्याच्या कष्टाचं हे फळ आहे. याच कष्टामुळे फक्त एक एकर शेतीमधून या दाम्पत्याने जवळपास 5 लाखांचं उत्पन्न मिळवलं आहे. मोसंबी बागेचे प्रचंड नुकसान झाल्यानंतरही हिंमत करत हे शेतकरी उभे राहिले आणि 6 वर्षांपूर्वी जांभळाची 100 रोपं लावली.
त्यानंतर गेल्या तीन वर्षापासून जांभळाला भरघोस बहर येतोय. त्यातून त्यांना दरवर्षी कमी खर्चात लाखोंचं उत्पन्न होतय. तसंच जांभळाच्या झाडांना पाणीही कमी प्रमाणात लागतं. त्यात फवारणीची गरज नाही आणि झाडांमध्ये आंतरपीक सुद्धा घेता येतं. त्यामुळे ही शेती फायद्याची असल्याचं रंजना डोईफोडे यांनी सांगितले.
हेही वाचा: Love Horoscope: 'हे' लोक आज त्यांच्या जोडीदारापासून वैयक्तिक गोष्टी लपवू शकतात, जाणून घ्या...
जांभळाला सध्या बाजारपेठेत चांगला दर आहे. 200 रुपये किलोपर्यंतचा भाव जांभळांना मिळतोय. त्यामुळे जांभुळ शेती करण्याचा निर्णय कसा योग्य होता हे सांगताना दोघांच्याही चेहऱ्यावर एक समाधान दिसला. पारंपारिक पिकांना फाटा देत मेहनतीच्या जोरावर जांभुळ लागवडीचा प्रयोग या शेतकरी दाम्पत्याने यशस्वी करुन दाखवलाय. त्यामुळे इतरही शेतकऱ्यांनी या प्रयोगशीलतेतून बरंच काही शिकण्यासारखं आहे.