छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याचे प्रवेशद्वार आणि राज्याचे महत्त्वाचे राजकीय केंद्र असलेल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या, गुरुवार 15 जानेवारी 2026 रोजी शहराच्या विकासाची सूत्रे कोणाच्या हाती द्यायची, याचा फैसला सुमारे 11 लाख मतदार करणार आहेत. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा मतदानासाठी सज्ज झाली असून, उद्या सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल.
मराठवाड्यातील सर्वात मोठी लढत
मुंबईनंतर राज्यातील सर्वांत चुरशीची निवडणूक म्हणून संभाजीनगरकडे पाहिले जात आहे. महापालिकेच्या 115 जागांसाठी तब्बल 859 उमेदवार नशीब आजमावत आहेत. यामध्ये दिग्गज राजकीय पक्षांपासून ते अपक्ष उमेदवारांपर्यंत मोठी फळी मैदानात असल्याने प्रत्येक वॉर्डात काट्याची लढत पाहायला मिळणार आहे. एकूण 11 लाख 17 हजार 477 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून, प्रशासनाने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ठिकठिकाणी जनजागृती केली आहे.
हेही वाचा: ZP Election 2026: निवडणुका जाहीर होताच तारखा बदलण्याची मागणी? या नेत्याचं निवडणूक आयोगाला पत्र, कारण काय?
प्रशासनाची 'कॅमेरा' नजर आणि चोख बंदोबस्त
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी प्रशासनाने तंत्रज्ञानाचा मोठा आधार घेतला आहे. शहरातील एकूण 1267 मतदान केंद्रांपैकी 537 केंद्रांवर वेबकास्टिंगद्वारे थेट लक्ष ठेवले जाणार आहे. मतदान कक्षाच्या आत आणि बाहेर बसवण्यात आलेल्या या कॅमेऱ्यांमुळे गैरप्रकारांना आळा बसेल. सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनासोबत समन्वय साधला असून, संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पाच हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची फौज
उद्याच्या प्रक्रियेसाठी प्रशासनाने मनुष्यबळाचे काटेकोर नियोजन केले आहे. एकूण 5,588 कर्मचारी आणि अधिकारी या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी असणार आहेत. यामध्ये केंद्राध्यक्ष आणि पोलिंग ऑफिसर्सचा समावेश आहे. तसेच, 173 क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या (Zonal Officers) माध्यमातून प्रत्येक केंद्रावर घडणाऱ्या घडामोडींचा आढावा घेतला जाईल. कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास 'राखीव कर्मचारी' आणि 'राखीव EVM'ची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
कुठे होणार मतमोजणी?
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व EVM यंत्रे सुरक्षितपणे स्ट्रॉंग रूममध्ये हलवण्यात येतील. शहरात यासाठी चार महत्त्वाची केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
1. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, उस्मानपुरा
2. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, स्टेशन रोड
3. SFS शाळा, जालना रोड
4. गरवारे आयटी पार्क, चिकलठाणा MIDC
या सर्व ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, 16 जानेवारी रोजी या केंद्रांवरच मतमोजणी होऊन ‘छत्रपती संभाजीनगरचा नवा कारभारी’ कोण, हे स्पष्ट होईल.
हेही वाचा: Public Holiday: मतदानासाठी 15 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर! मात्र काही कर्मचाऱ्यांना सुट्टीऐवजी विशेष सवलत