छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या जाफर गेट मोंढा परिसरात मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मोकाट कुत्र्याच्या चाव्याने एका निष्पाप तीन वर्षांच्या चिमुकल्याचे आयुष्य संपले आहे. या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. अरमान शेख नावाचा हा तीन वर्षांचा चिमुकला आठ दिवसांपूर्वी घराजवळ खेळत होता. त्यावेळी एका मोकाट कुत्र्याने त्याचा चावा घेतला. त्यानंतर अरमानच्या शरीरावर कुठेही गंभीर जखम झाली नाही. त्यामुळे घरच्यांनी याकडे दुर्लक्ष केले आणि सगळं ठीक होईल असं गृहीत धरलं. अखेर चिमुकल्याचा जीव गेला.
कुत्र्याने चावा घेतल्यानंतर काही दिवसांनी मुलाला ताप येऊ लागला, त्यानंतर डोक्यात एक छोटी जखम असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. मात्र, त्यानंतर मुलामध्ये एक गंभीर लक्षण दिसू लागले. तो पाणी पाहून थरथर कापू लागला. आईने त्याला पाणी देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो भीतीने मागे सरकला आणि रडत रडत म्हणाला, "आई, पाणी नको… मला वाचव… आई मला वाचव ना…" मुलाचे हे शब्द ऐकून आईच्या पायाखालची जमीन सरकली. तिने त्याला मिठी मारली, त्याच्या अंगावरून हात फिरवत त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. पण, रेबीजच्या संसर्गामुळे त्या लहानशा जीवाचा श्वास हळूहळू कमी होत गेला.
हेही वाचा: Health Checkup: आगामी निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वपूर्ण निर्णय, ही महापालिका दातांचे मोफत उपचार करणार
'अरमानच्या केसांमध्ये लपलेले कुत्र्याच्या दातांचे व्रण'
अरमानचे काका, शेख रहीस यांनी सांगितले की, "कुत्र्याने हल्ला केल्याबद्दल आम्हाला कोणीही सांगितलं नाही. खेळताना पडल्यामुळे लागलं असं अरमाननं सांगितलं होतं." घटनेच्या आठ दिवसानंतर अरमान जेव्हा आपले डोके खाजवू लागला, तेव्हा कुटुंबीयांना केसांखाली लपलेले कुत्र्याच्या दातांचे व्रण दिसले. व्रण दिसताच कुटुंबीयांनी अरमानला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, एका रुग्णालयाने दुसऱ्या रुग्णालयात रेफर केले. पुढील दोन रुग्णालयांनीही या चिमुकल्यावर उपचार करण्यास नकार दिला आणि मुलाचे वाचणे कठीण आहे, असे कुटुंबीयांना सांगितले.
शेवटच्या क्षणी अरमानला पाणी पाहण्याची भीती वाटू लागली. अरमान सतत आपले शरीर खाजवत होता आणि घाबरून ब्लँकेटखाली लपत होता. मोकाट कुत्र्यांसारखे अरमानच्या तोंडातून पाणी गळू लागले होते. यामुळे डॉक्टरांनी कुटुंबीयांना रेबीज प्रतिबंधक लस घेण्याचा सल्ला दिला होता. या दुर्घटनेनंतर अरमानचे कुटुंब घाबरले आहे. अशा प्रकारचे दुःख इतर कोणाच्याही वाट्याला येऊ नये, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाकडे त्यांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.