मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय आणि जहाजाभोवती कृत्रिम प्रवाळ निर्माण करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक जवळ हा प्रकल्प होणार असून याचा शुभारंभ दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
भारतातील हा पहिलाच उपक्रम असून यामुळे सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना मिळणार आहे. समुद्रात विराजमान होणाऱ्या जहाजाभोवती प्रवाळ निर्मिती होऊन त्याद्वारे स्कुबा डायव्हिंग व भविष्यात पाणबुडीद्वारे पर्यटन करता येणे शक्य होणार आहे. केंद्र शासनाने ऐतिहासिक पाऊल उचलत भारतीय नौदलाचे निवृत्त जहाज आयएनएस गुलदार हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सुपूर्द केले आहे. जगातील अनेक देशात असे प्रकल्प तयार केले आहेत. हा प्रकल्प तयार करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या मान्यतेने भारतीय नौदलाने निवृत्त युद्धनौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास विना मोबदला उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, दूरदृश्य प्रणालीद्वारे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर सहभागी झाले.
हेही वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कारागृहात निर्मित वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन
सेवानिवृत्त जहाजाचे स्वरूप
या जहाजाचे 1,120 टन वजन आहे. तर 83.9 मोटर लांबी असून 9.7 मीटर रुंदी आहे. 5.2 मीटर इतकी खोली आहे. हे जहाज 12 जानेवारी 2024 रोजी सेवानिवृत्त झाले आहे. केंद्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळांचा विकास करणे या योजनेंतर्गत ‘स्पेशल असिस्टंट्स टू स्टेटस फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट’ (भाग 3) (Special Assistance to States for Capital investment (Part-3) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आयएनएस गुलदार सेवानिवृत्त युद्धनौका निवती रॉक जवळ समुद्रात संग्रहालय आणि कृत्रिम रीफमध्ये रूपांतरित करणे (Ex – INS Guldar Underwater Museum, Artificial reef and Submarine Tourism, Sindhudurg) या प्रकल्पास केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने 27 डिसेंबर 2024 रोजी रु.46.91 कोटीस मान्यता दिली आहे. भारतीय नौदलाने सदरचे निवृत्त जहाज पोर्टब्लेअर, अंदमान येथून कारवार नेव्हल बेस, कर्नाटक याठिकाणी स्वखर्चाने पोहोच करण्याची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची विनंती मान्य केली, ज्यामुळे राज्य शासनाची आर्थिक बचत झाली आहे.
प्रकल्पाचे टप्पे
भारतीय नौदलाकडून बोटीचा अधिकृतरित्या 22 फेब्रुवारी 2024 रोजी कारवार नेवल बेस येथे बोटीचा अधिकृत ताबा घेण्यात आला. कारवार येथून विजयदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग येथे जहाज घेऊन (Tow) येणे. हे जहाज 16 मार्च 2025 रोजी यशस्वीरित्या कारवार येथून विजयदुर्ग येथील महाराष्ट्र सागरी मंडळाच्या जेट्टीवर सुरक्षितरित्या आणण्यात आले. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या (एमएमबी) विजयदुर्ग येथील जेट्टीला विना मोबदला साधारणपणे सहा ते सात महिने सदरचे जहाज सुरक्षितरित्या ठेवण्याकरिता परवानगी देण्यात आली आहे. जहाजाची पर्यावरणीय साफसफाई करण्याकरिता नियुक्त केलेल्या संस्थेने या जहाजाची 15 एप्रिल 2025 रोजी पूर्णपणे पर्यावरणीयदृष्ट्या साफसफाई केली आहे. आयएनएस गुलदार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्राच्या तळाशी निवती रॉक येथील (Latitude-15° 56.138°N and 73° 22.601’E Longitude 15°50.676’N and 73°25.956°E) येथे विराजमान (Scuttling) करण्याकरिता माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांना 16 एप्रिल 2025 रोजी कार्यादेश देण्यात आला असून वातावरण अनुकूल असेल त्या दिवशी प्रत्यक्षपणे ही कार्यवाही पार पाडली जाणार आहे. समुद्रात विराजमान होणाऱ्या जहाजाभोवती प्रवाळ निर्मिती होऊन त्याद्वारे स्कुबा डायव्हिंग व भविष्यात पाणबुडीद्वारे पर्यटकांना या प्रवाळ व समुद्रतळाशी विराजमान जहाजाची सफर करण्याचे नियोजित आहे.