अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अर्थसंकल्प मांडणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याठिकाणी वर्ष 2026-27 चा अर्थसंकल्प मांडणार आहेत. राजकीय कारकीर्दीत देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी 2.00 च्या नंतर अर्थसंकल्प मांडणार असून या अर्थसंकल्पातून काय मिळणार? कोणत्या नवीन योजनेची घोषणा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ करणार का? याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष असणार आहे. तसेच शेतकरी कर्जमाफी, पायाभूत सुविधा, सिंचनाची कामे यावर आगामी आर्थिक वर्षासाठी किती निधी राखून ठेवण्यात येतो, हेही पाहावे लागणार आहे. त्याचसोबत सरकारच्या कोणत्या योजनांच्या निधीला कात्री लागणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा- Jishnu Dev Varma : महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळाले! देवव्रत आचार्य यांच्या जागी जिष्णू देव वर्मा राज्यपालपदी
दरम्यान आज राज्याचे अर्थसंकल्प जाहीर होण्यापुर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे. दुपारी 1.00 वाजता विधानभवनात राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीला सुरुवात होईल, तसेच या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असतील. त्याचसोबत राज्यमंत्री मंडळातील सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार असून या बैठकीत अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे त्या संदर्भात चर्चा केली जाणार असल्याची शक्यता आहे.